आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Boy Seriously Injured In A Attack Of Stray Cattle's

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिडकाेत मोकाट जनावरांच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- सिडकोतील साईबाबानगरमध्ये शाळेत जाणाऱ्या सात वर्षीय मुलावर मोकाट जनावरांनी हल्ला केल्याने ताे गंभीर जखमी झाला. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत मुलाला जनावरांच्या ताब्यातून सोडवून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मोकाट जनावरांबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने घटनास्थळी आलेल्या विभागीय अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत जाब विचारला. 

 

महेश शरद पवार पवननगर येथील हिरे विद्यालयात इयत्ता पहिलीला आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता तो आईसोबत शाळेत जात असताना साईबाबा मंदिर भागातील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या मोकाट जनावरांतील एका गाईने अचानक महेशवर हल्ला केला. त्यानंतर दुसरी जनावरेही धावून आली. काही कळायच्या आत त्यांनी हल्ला चढविला. एका गाईने महेशला शिंगावर घेत बाजूला फेकले. हा प्रकार पाहून महेशच्या आईने आरडाओरड केली. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत महेशची जनावरांच्या हल्ल्यातून सुटका केली. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. या सर्व प्रकाराने परिसरातील संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. वातावरण चिघळू नये म्हणून घटनास्थळी दाखल झालेल्या विभागीय अधिकारी सुनीता कुमावत व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांना महिला व नागरिकांनी घेराव घालत जाब विचारला. यावेळी सिडको सभापती हर्षा बडगुजर, नगरसेवक मुकेश शहाणे, भाजप मंडल अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते भूषण राणे, हरिष महाजन, देवचंद केदारे, नितीन माळी, प्रणव मानकर, उदय देशमुख यांनी कारवाईची मागणी केली. अजय चव्हाण, विशाल नांद्रे, दीपाली सूर्यवंशी, अर्चना भडांगे, सत्यभामा पाटील, सविता साळुंखे, आम्रपाली लांडगे, कामना सोनवणे, छाया सावंत, पूनम कुमावत, वैशाली पगारे, उषा मोरे, निंबा बस्ते, सरीचंद चव्हाण, दीपक गांगुर्डे, दिलीप चौधरी आदी नागरिकांनी प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान आमदार सीमा हिरे व माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे यांनी रुग्णालयात जाऊन महेशच्या प्रकृतीची चौकशी केली. 

 

..तर आंदोलन उभारू 
मोकाट जनावरांच्या बाबतीत पालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून गांभीर्याने दखल न घेतल्यास त्या विराेधात आंदोलन उभारू. - देवचंद केदारे, नागरिक 

 

गुन्हे दाखल करा 
मोकाट जनावरांबाबत १५ दिवसांपूर्वीच अर्ज केला हाेता. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. - वैशाली पगारे, नागरिक 

 

घटनेला जबाबदार कोण? 
या चिमुकल्यावर झालेल्या हल्ल्याला जबाबदार कोण? नागरिकांना कोणी वाली आहे की नाही? यापूर्वीच याची दखल घेतली असती तर ही घटना टळली असती. - पूनम कुमावत, नागरिक 

 

वैद्यकीय भरपाई द्या 
मोकाट जनावरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महेश पवारला मनपाने वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करावी. शिवाय, या घटनेबाबत स्पष्टीकरण द्यावे. - हरिष महाजन, सामाजिक कार्यकर्ते 

 

पालिका प्रशासनाला गांभीर्य नाही 

१५ दिवसांपूर्वीच या भागातील नागरिकांनी त्या भागातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. सिडको विभागीय कार्यालयाकडे याबाबत तक्रार अर्जही दिला होता. मात्र नेहमीप्रमाणे मनपा विभागीय अधिकाऱ्यांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यावेळी तत्काळ दाखल घेतली असती तर ही घटना घडली नसती. 

 

जनावरांचे मालक गेले कुठे? 
मोकाट जनावरे सोडण्यामागे अनेक कारणे आहेत. शहरात जनावरांना खाण्यासाठी चारा मिळत नसल्याने त्यांचे मालक मोकाट सोडतात. ही जनावरे कचरा किंवा नागरिकांनी अन्न टाकलेल्या ठिकाणी जमा होतात. दिवसभर फिरून सायंकाळी पुन्हा मालकाकडे जातात. काही जनावरे प्लास्टिक किंवा चुकीचे पदार्थ खाल्ल्याने हिंस्त्र बनतात व हल्ला करतात. सिडकोतील घटनेनंतर या जनावरांचा मालक कोण, हा प्रश्न समोर आला असून त्यांची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. त्यामुळे या जनावरांना पकडून पांजरपोळात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, मनपा प्रशासनाने त्याचेही गांभीर्य दाखवले नाही.
 
गाईने ठोस मारल्याने वृद्धा जखमी 
साईबाबानगर येथील महेश पवार या सात वर्षीय मुलावर मोकाट जनावरांनी हल्ला केल्याच्या प्रकारांनंतर काही वेळातच त्याच भागात पुढे गंगेश्वर राे हाऊस येथून जाणाऱ्या सीताबाई ठाकरे (७०) या वृद्धेला एका मोकाट गाईने ठाेस मारली. यात त्या जखमी झाल्या. नागरिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात उचारासाठी दाखल केले. सिडकोतील या सलग दुसऱ्या घटनेने मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सीताबाई ठाकरे यांच्या पायाला व पाठीला जखम झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी या गाईला पिटाळून लावले. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा तसेच मोकाट जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.