आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हापासून बचावासाठी मुलगा कारमध्ये, दरवाजे लाॅक झाल्याने गुदमरून मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट - भरउन्हात कचरा वेचता वेचता १२ वर्षीय मुलगा अाडाेशाला उभ्या असलेल्या नादुरुस्त कारमध्ये जाऊन बसला. उत्सुकतेपाेटी ताे गाडी न्याहाळत असतानाच कारचे दरवाजे लाॅक झाले. क्षणभर काहीच समजले नाही. मात्र बराच वेळ प्रयत्न करूनही दार न उघडल्याने त्याने मदतीसाठी हाकाही मारल्या. अाजूबाजूला काेणीच नसल्याने त्याच्या मदतीला काेणीही अाले नाही. काही वेळाने श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी अकाेट तालुक्यातील देवरी फाट्यापासून जवळच असलेल्या अालेवाडी येथे ही घटना घडली. सायंकाळी या घटनेचा उलगडा झाला.


तानेश विष्णू बल्लाळ असे मृत बालकाचे नाव आहे. आजी व मावशीसोबत ताे कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या वेचण्यासाठी अकाेट फैल गावातून आलेवाडीत आला होता. याच गावात त्याचे नातेवाईकही राहतात. मंगळवारी आजी व मावशीसोबत तानेश गावच्या मागच्या दिशेने कचरा वेचता वेचता गेला. तिथे त्याला काटेरी झुडपात एक ओपेरा कार उभी असलेली दिसली. कारचे मालक नागेश कराळे यांच्या मते, तांत्रिक कारणामुळे बंद असलेली ही कार दाेन वर्षांपासून या भागात पडून अाहे. बाहेर खूप ऊन असल्यामुळे तानेश बचावासाठी व गाडीच्या उत्सुकतेपाेटी या बंद कारमध्ये जाऊन बसला. मात्र त्यानंतर कारचे दरवाजे लाॅक झाले. काही वेळात त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र दार उघडता अाले नाही. मदतीसाठीही त्याने अारडाअाेरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा परिसर निर्मनुष्य असल्याने काेणीच त्याच्या मदतीला जाऊ शकले नाही. अखेर श्वास गुदमरून तानेशचा मृत्यू झाला.
 

आजी, मावशीकडून शोधाशोध 
इकडे, तानेश दिसत नसल्याने आजी व मावशीने त्याचा परिसरात शाेध सुरू केला. सायंकाळी या कारजवळ दाेघी आल्या असता तानेशजवळ असलेली पिशवी तिथे दिसली. त्यांनी कारमध्ये डाेकावून पाहिले असता तानेश मृतावस्थेत दिसून आला. पाेलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढला.
 

तानेशची परिस्थिती अत्यंत गरिबीची 
तानेश हा तल्लख होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. कचरा वेचून तो विकल्यानंतर उदरनिर्वाह करणारे त्याचे कुटुंब आहे. तानेशच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर अकोट फैलातील अशोकनगरातील नागरिकांनी आलेवाडी येथे धाव घेतली होती.दरम्यान, तानेशचा मृत्यू संशयास्पद असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवक पराग काबंळे यांनी पोलिसांकडे केली आहे. तर कारमध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला असावा, अशी माहिती ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.