आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवदर्शनासाठी आलेली नववधू चारचाकीतून पसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र राजूर - देवदर्शनासाठी अालेल्या नववधूने चारचाकीत बसून पोबारा केल्याची घटना रविवारी दुपारी २.३० वाजता भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथे घडली. महादेवी बसवेश्वर स्वामी (शिवाजीनगर, नांदेड) असे या नववधूचे नाव असून ती चारचाकीत निघून गेल्याची तक्रार पती सुधीर रेणुकादास जोशी (३५, आडगाव खुर्द, जि. औरंगाबाद) यांनी राजूर पोलिस चौकीत दिली. यावरून पोलिसांनी जाधव नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. 


सुधीर जोशी हे २६ जून रोजी महादेवीसोबत विवाहबंधनात अडकले. दरम्यान, रीतिरिवाजाप्रमाणे ते रविवारी दुपारी आडगाव येथून गणपती दर्शनासाठी श्रीक्षेत्र राजूर येथे आले. दरम्यान, पूजेचे साहित्य घेतल्यानंतर पत्नीने यायला जमणार नाही, अडचण आहे असे म्हणत तुम्ही दर्शन करून या, मी इथेच थांबते असे सांगितले. यानुसार सुधीर हे पत्नीला पायऱ्यांजवळ थांबायचे सांगून दर्शनासाठी मंदिरात गेले. काही वेळानंतर परतल्यावर त्यांना पायऱ्याजवळ पत्नी दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला विचारपूस करत शोधाशोध केली, मात्र काहीच थांगपत्ता लागला नाही. या वेळी पूजेचे साहित्य विक्रेत्यांनी एका चारचाकीत बसून नववधू गेल्याची माहिती दिली. यावरून नववधू कुणासोबत तरी निघून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सुधीर याने ताबडतोब नातेवाइकांना कळवले तसेच राजूर पोलिस चौकीत धाव घेऊन घडलेला प्रकार कथन केला. तसेच काही वेळापूर्वी जाधव नामक व्यक्तीचा मोबाइलवर फोन आला होता, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पत्नी चारचाकी मध्ये बसून गेली असून यात एक महिलासुद्धा होती. तिनेच गाडीत बोलावून घेत पत्नीला घेऊन गेल्याची तक्रार दिली असून यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.