आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Bride's World Will Be Happy, By Sacrificing Her Favorite 'career' Article By Maheshkumar Munjale

नवऱ्याचा संसार सुखाचा करीन, आवडीचे ‘करिअर' सोडुनिया...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"व्हूट' अॅपवर नुकतीच "केकवॉक' असं शीर्षक असलेली एक शॉर्टफिल्म आली आहे. स्वयंपाकात वेगवेगळे प्रयोग करून "मास्टर शेफ' या शोमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेल्या एका गृहिणीचा करिअर आणि संसार या दोन्हींना एकावेळी सांभाळतानाचा संघर्ष आणि त्यानंतर तिने त्यावर शोधलेला उपाय या सर्वाला दाखवणारी गोष्ट या लघुपटात आहे.
 
"पोरींची लग्नं अठरा पूर्ण झाल्या झाल्या करा. पंचवीस पूर्ण होईपर्यंत त्या इतक्या मॅच्युअर होतात की कुणाच्या बापाला ऐकत नाहीत. आईने मला शाळेतसुद्धा घालायला नकार दिला. आई म्हणाली, लिहिता-वाचता आलं ना बास झालं. अक्षरशः मुलींचे पाय जमिनीवर नाहीत शिक्षणामुळे. त्या बाईने केवळ हट्टीपणाने करिअर करिअर करत घराबाहेर पडणं आवश्यक आहे का? इतके आपण पाश्चात्त्य झालो आहोत? काढा सगळं डोक्यातनं. स्त्री-पुरुष समानता, स्त्री-पुरुष समानता घटनेने दिलीय हो.. पण निसर्गाने दिलेला दुबळेपणा लपवता येतो का? पाच हजार वर्षांपूर्वी जेवढं शील आणि चारित्र्य महत्त्वाचं होतं तेवढंच आजही आहे.' हे विचार आहेत अॅड. अपर्णा रामतीर्थकर या बाईंचे.
 
 
मागे काही वर्षांपूर्वी अशी अफवा पसरवली होती की, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर असताना जी गीता सांगितली त्या आवाजाचे काही तरंग वैज्ञानिकांना विशिष्ट यंत्रावर सापडले आहेत. पुढे त्या तरंगांचे काय झाले, त्या स्टेशनची नेमकी किती फ्रिक्वेन्सी होती हे पुढे काही कळायला मार्ग नाही. पण आता या सोशल मीडियाच्या काळात तुम्ही अजरामर आहात. तुम्ही लिहिलेलं-बोललेलं-वागलेलं सोशल मीडियात गेलं असेल तर ते पुन्हा मागे घेणं किंवा ते नेस्तनाबूत करणं फार अवघड आहे. तुमच्या मृत्यूनंतरही तुमच्या त्या विचारांना मरण नाही. सांगण्याचा मुद्दा हा की, सामाजिक कार्यकर्त्या-विचारवंत असं ज्यांना काही लोक मानतात त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे बऱ्याच वर्षांपूर्वीचे भाषण परवा सोशल मीडियावर फिरत फिरत नेटकऱ्यांपर्यंत पोहोचले. हजारो लोकांनी ते पाहिले, त्यातील कैकांनी शेअर केले आणि सर्वांनी मिळून बाईंच्या बोलण्याचा यथोचित समाचारही घेतला. ‘वर्ल्ड बिफोर हर' नावाच्या गाजलेल्या माहितीपटामध्ये वापरलेलं हे त्यांचं भाषण होतं. त्यात “दुर्गा वाहिनी' या हिंदुत्ववादी महिला संघटनेचा देखील संदर्भ होता.
 
 
"तुम्हाला सांगतो मुलगी दिसायला तर उत्तम आहेच, पण संस्कारसुद्धा एकदम खणखणीत वाटले मला. मी जेव्हा म्हणलं, तू जॉब करायचं म्हणतीयेस पण मग संसाराचं काय? तेव्हा काय म्हणली माहितीय ती? "संसार सांभाळूनच मी जॉब करेन.' उद्या जाऊन जॉब करीन नाय करीन विषय लांब, पण तिचं एवढं बोलणं सुद्धा लय झालं. पोरगी चांगलीये हातची जाऊ देऊ नका.' ही मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करून आलेल्या एका कुटुंबातील चर्चेत कानावर पडलेली वाक्ये. या वाक्यांत पुरुषप्रधान संस्कृतीच्या कितीतरी छटा आपल्याला पाहायला मिळतील. वयाची तब्बल पंचवीसएक वर्षे शिक्षणासाठी दिलेल्या मुलीला जेव्हा तिचा नवरा, सासू सासरे 'आपल्याकडे भरपूर सुबत्ता आहे, त्याचा पगार सुद्धा चांगला आहे, तुझ्या पैशाची गरज नाही तू जॉब करू नको. संसाराकडे मुला-बाळांकडे नीट लक्ष दे तेवढंच पुरेसं आहे' असं म्हणतात तेव्हा आपण त्या घटनेचे साक्षीदार असलो किंवा स्वतः बोलणारे असलो तरीही त्या मुलीवर काही अन्याय होतोय याची जाणीव आपल्याला होत नाही. कारण करिअर, जॉब या गोष्टी केवळ पैसा कमावण्याचे साधन म्हणूनच आपण पाहत असतो. त्या मुलीच्या स्वावलंबी असण्यासाठी, तिच्या व्यवहार ज्ञानासाठी, तिचा जगाबद्दलचा दृष्टीकोन विकसित होण्यासाठी तिचं करिअर आहे हे बऱ्याचदा तिच्या स्वतःच्या आईला सुद्धा कळत नाही.
 
 
माझ्या ओळखीत एक प्राध्यापक आहेत. त्यांच्या घरी गेल्यावर बायकोची ओळख करून देताना त्यांनी सांगितलं की "ती पीएचडी स्कॉलर आहे, प्रबंध पूर्ण करून सोपवला की काही दिवसांनी तिला डॉक्टर म्हणावं लागेल. पण सध्या एक दोन वर्ष आम्ही जरा गॅप घेतलाय. आम्हाला बेबी झालं, ते मागचे नऊ महिने आणि आता त्याला फीडिंग वगैरे सर्व करावं लागतं म्हणून आताचे काही महिने तिला पूर्ण लक्ष त्याकडेच द्यावं लागतं. म्हणून मग ती घरीच असते. ती व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आताही जाऊ शकली असती पण घरचे सुद्धा म्हणाले की नकोच सध्या. 
 
 
बाळ महत्त्वाचं. पीएचडीपर्यंत पोहचलेल्या बायकोला हे लोक बाळाची जबाबदारी म्हणून अडकवू पाहतायेत हे मला तरी व्यक्तिशः भयानक वाटलं. माझे पत्रकारितेचे प्राध्यापक जयदेव डोळे सर गप्पा मारता मारता म्हणायचे, "स्त्रीला तिच्या चारित्र्याचे आणि मातृत्वाचे दाखले देत नियंत्रित केलं जातं. बाईने मूल सांभाळावं, त्या बाळाला आईची जास्त गरज असते वगैरे म्हणून तिला तिच्या करिअरपासून दूर ठेवलं जातं. आम्हाला मूल झालं तेव्हा माझी बायको नोकरीला होती. तिने बाळंतपणानंतर काही दिवसांत ऑफिसला जायला सुरुवात केली होती. तेव्हा त्या बाळाचं सर्व काही मी स्वतःच पाहायचो. त्याची शी-शु सर्व काही मीच करायचो. त्याचा बाप आहे, माझं कर्तव्यच आहे ते. जेवणाच्या सुट्टीत ती घरी यायची दूध पाजायला. पुरुषाला स्तन नाहीत. नाहीतर तेवढ्यासाठी सुद्धा तिची गरज भासली नसती.' हे असे विचार करणारे लोक एकीकडे आणि मातृत्वाला दैवी वगैरे म्हणत चांगल्या नोकरीचा राजीनामा देऊन बाईला घरी बसवणारे लोक एकीकडे.
 
 
"व्हूट' अॅपवर नुकतीच एक शॉर्टफिल्म आली आहे. स्वयंपाकात वेगवेगळे प्रयोग करून "मास्टर शेफ' या शोमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेल्या एका गृहिणीचा करिअर आणि संसार या दोन्हींना एकावेळी सांभाळतानाचा संघर्ष आणि त्यानंतर तिने त्यावर शोधलेला उपाय या सर्वाला दाखवणारी गोष्ट लघुपटात आहे. "केकवॉक' असं शीर्षक असणाऱ्या या लघुपटाची गोष्ट, त्यामागची संकल्पना एवढी मजबूत आहे की इतर तांत्रिक बाबींकडे फारसं लक्षही जात नाही. या लघुपटामधून हेमा मालिनी- धर्मेंद्र यांची कन्या ईशा देओल पुन्हा एकदा स्वतःला चंदेरी पडद्यावर आजमावून पाहायला आल्याने माध्यमांत या लघुपटाची चांगलीच चर्चा आहे. हा लघुपट पाहताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की कुटुंब कोणत्याही वर्गातलं असलं तरी पुरुषप्रधान मानसिकतेला सीमाच नाहीत.
 
स्वयंपाक बनवणं, घर स्वच्छ ठेवणं, बाळ सांभाळणं या गोष्टीसाठी स्त्रीच असावी ही आपली परंपरा डोक्यातून गेली तर संसार नक्कीच सुखाचा होईल. बाळ जन्माला घालणं आणि त्याला स्तनपान करवणं यासाठी स्त्रीच लागेल हे मान्य; पण याव्यतिरिक्तची सर्व जबाबदारी पुरुषाने घेतली तर त्याच्या पुरुषत्वावर शंका घेतली जाईल का? ही बदलत्या काळाची, समानतेची मानसिकता निर्माण व्हायला वेळ लागेल पण तिची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. प्रत्येक महिलेने स्वतःचा आवाज तेवढा बुलंद ठेवायला हवा. नाहीतर पूर्वापार चालत आहेच की "अवघाचि संसार सुखाचा करीन, आवडीचे ‘करिअर' सोडुनिया.....'
 

लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७

बातम्या आणखी आहेत...