आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसीच्या कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामुळे वाढतेय संपूर्ण जगाचे तापमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रॉकी माउंटन इन्स्टिट्यूट, भारत सरकारतर्फे उपाय शोधण्यासाठी स्पर्धा

चंद्रकांत शिंदे

मुंबई- जगभरात घर आणि कार्यालयांमध्ये एसी वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून यामुळे विजेची आवश्यकता तर मोठ्या प्रमाणावर भासतेच तसेच कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जनही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जगाच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन रॉकी माउंटन इन्स्टिट्यूट आणि भारत सरकारने एसीसाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी एक स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत जगातील २१०० कंपन्यांनी भाग घेतला होता त्यापैकी आठ कंपन्यांना उपाय सादर करण्याची परवानगी देण्यात आली असून यात भारतातील फक्त गोदरेज कंपनीचा समावेश आहे.
इंडो-जर्मन एनर्जी फोरम २०१८ च्या अहवालानुसार २०२७ पर्यंत भारतातील कूलिंग एनर्जीची मागणी २.२ पटींनी वाढण्याची शक्यता आहे. वाढते शहरीकरण आणि वाढत्या उत्पन्नामुळे एसी घेणाऱ्यांची संख्या वाढत असून २०५० पर्यंत देशातील एसीची संख्या एक अब्जापर्यंत जाईल, असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. एसीच्या वाढत्या वापरामुळे अर्बन हीट आयलंड परिणाम वाढत असून शहरांतील तापमानही वाढत आहे. एसीच्या मागणीत वाढ झाली तर विजेची मागणी वाढेल व वीजनिर्मितीवरही ताण येणार असून उत्सर्जनामध्येही मोठी वाढ होणार आहे.
यूएनईपीच्या उत्सर्जन अहवालानुसार २०१८ मध्ये जागतिक जीएचजी उत्सर्जन हे ५५.३ गीगा टन कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनाइतके होते. याच प्रमाणात उत्सर्जन होत राहिले तर भारतातील सरासरी तापमान २१०० सालापर्यंत २४ अंश सेल्सियसवरून २८ अंश सेल्सियसपर्यंत वाढेल, असा अंदाज क्लायमॅट इम्पॅक्ट लॅबने केलेल्या संशोधनातून समोर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन भारत सरकार व रॉकी माउंटन इन्स्टिट्यूट यांच्या जागतिक सहयोगाने निवासी एअर कंडिशनिंगमुळे निर्माण झालेल्या धोक्यावर मात करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधण्याचे आवाहन करत स्पर्धा घेण्यात आली. यात ३१ देशांमधील २१०० पेक्षा जास्त कंपन्यांनी नोंदणी केली. या स्पर्धकांच्या कल्पनांचा अभ्यास करून १५ नोव्हेंबर रोजी दिल्लीत आठ कंपन्यांना आपल्या नावीन्यपूर्ण योजना सादर करण्यास सांगितले. व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बक्षिसाचे जागतिक ब्रँड अँबेसेडर सर रिचर्ड ब्रॅन्सन आहेत.

अंतिम आठ स्पर्धकांत देशातून केवळ गोदरेज कंपनीचा समावेश
 
गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, देशातून फक्त आमच्याच कंपनीचा जगभरातील आठ अंतिम स्पर्धकांमध्ये आणि ग्लोबल कूलिंग प्राइझसाठीच्या १३९ अर्जांमध्ये समावेश झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. हरित तंत्रज्ञानावर आम्ही भर देत असून एप्रिल २०२० पर्यंत ८० टक्के वीज बचत करणाऱ्या आणि हवामानावर पाच पटींनी कमी परिणाम करणाऱ्या एसीचे प्रोटोटाइप तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

जगातील विमानतळांवर २५ अंश तापमान ठेवले जाते
 
एसीच्या वापरामुळे विजेचा पुरवठा जास्त करावा लागत असल्याने आणि वातावरणावर परिणाम होत असल्याने जपानमधील विमानतळांवर २५ अंश तापमान ठेवले जाते. जपानच्या पावलावर पाऊल ठेवून अमेरिकेसह अन्य अनेक देशांमध्येही विमानतळांवर २५ अंश तापमान ठेवले जात असून भारतातील विमानतळांवरही पुढील वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती कमल नंदी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...