आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रबिंदू वाचकच, आम्ही फक्त माध्यम!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या, बहुविधतेने नटलेल्या औरंगाबादेत आठ वर्षांपूर्वी ‘दिव्य मराठी’ने प्रवेश केला. गेल्या आठ वर्षांच्या या प्रवासाचा महाराष्ट्र केवळ साक्षीदार नाही, शिल्पकारही आहे. माध्यमांची विश्वासार्हता संपत चाललेल्या या कालखंडात तर हे वेगळेपण अधोरेखित होत गेले आहे.


लोकशाही आणि माध्यमांचा प्रवास हातात हात गुंफून झाला आहे. भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात या प्रवासाला आणखी वेगळे संदर्भ आहेत. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे सगळे नेते पत्रकार होते, संपादक होते. लोकमान्य टिळकांपासून ते महात्मा गांधींपर्यंत आणि महात्मा फुल्यांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वांनीच माध्यमांचा उपयोग केलेला दिसतो. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी असला पाहिजे, या भूमिकेतून माध्यमे विस्तारत गेली. मूठभरांच्या हातात सगळी सूत्रे एकवटलेली असताना, माध्यमांनी लोकशाहीकरणाचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेसारख्या संविधानिक मूल्यांची उभारणी करण्यात पत्रकारितेचा वाटा मोठा आहे. 


‘राज्यघटना शेवटी काय देईल? कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव फक्त देईल. पण, त्यामध्ये प्राण फुंकतील ते आम्ही भारताचे लोक!’, अशी भूमिका ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना सादर करताना मांडली, त्या सामान्य माणसाचे सक्षमीकरण केले ते पत्रकारितेने. पत्रकारितेने ‘नागरिकत्व’ सेलिब्रेट करत हा देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक केला. सहजपणे नाही मिळालेले हे प्रजासत्ताक. त्यासाठी कित्येकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्य चळवळीने हे मूल्य विकसित केले. आणि स्वातंत्र्यानंतर दोन वर्षे अकरा महिने १७ दिवस अथक परिश्रम करून संविधान तयार झाले. जो मताधिकार मिळवण्यासाठी इंग्लंड- अमेरिकेत कित्येकांना आपले प्राण गमावावे लागले, तोच अधिकार भारतात मात्र पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला मिळाला. तुम्ही कोणत्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे, वंशाचे असा, स्त्री असा अथवा पुरुष असा, हा देश तुमचा आहे, ही ग्वाही मिळाली. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही तर आहेच ही. पण, सर्वसमावेशकतेच्या अधिष्ठानावर उभा राहिलेला जगात भारी असा देश आहे हा!


भारत आणि चीन या दोन देशांत मिळून जगातली जवळजवळ निम्मी लोकसंख्या नांदते. हे देश अवघ्या मानवी समुदायासाठीच किती महत्त्वाचे आहेत, हे यावरून समजावे! अगदी, १९५० ते १९९० मधील एका सर्वेक्षणानुसार, भारतातील निरक्षरतेचे प्रमाण, उत्पन्नाचा स्तर, विषमता यांचा विचार करता; तसेच सामाजिक ताण, उतरंड विचारात घेता, हुकूमशाहीसाठी भारत ही अगदी आदर्श केस होती! अशा देशात एकसंधतेची भावना निर्माण करणे, तरीही सर्वसमावेशकतेला जागा असणे आणि प्रत्येकाला नवी आकांक्षा देतानाच लोकशाही मूल्ये रुजवणारा ‘राष्ट्रवाद’ विकसित करणे हे सोपे काम नव्हते. हा राष्ट्रवाद विकसित करण्यात माध्यमांचा वाटा मोठा आहे. वर्तमानपत्र हे स्वातंत्र्य चळवळीचे वाहन होते, तर स्वातंत्र्यानंतरचा देश घडवण्याचे मोठे काम हिंदी चित्रपटांनीही केलेले दिसते. 


माध्यमांविषयी सध्या सातत्याने बोलले जाते. त्यातही पत्रकारितेविषयी. रवीश कुमार यांच्यासारखा प्रख्यात संपादकच ‘वृत्तवाहिन्या बघू नका, वर्तमानपत्रे वाचू नका’, असे आवाहन करू शकतो, असा हा काळ आहे. गेल्या पन्नास वर्षांचा माध्यमांचा प्रवास त्या दृष्टीने पाहायला हवा. माध्यमांचे स्वरूप उत्तरोत्तर बदलत गेलेले दिसते. तीन ‘आर’ माध्यमांच्या संदर्भात महत्त्वाचे ठरू लागले. रीच, रेव्हेन्यू आणि रिलिव्हन्स हे तीन ‘आर’ माध्यमाचे स्वरूप निश्चित करू लागले. माध्यमांचे जग आमूलाग्र बदलले ते जागतिकीकरणानंतर. जागतिकीकरणाने अर्थकारण तर बदलून टाकलेच, पण त्यामुळे संस्कृतीही बदलत गेली. मानवी संबंधांना नवे परिमाण मिळाले. ज्ञानाच्या कक्षा रुंद झाल्या. दरवाजे खुले झाले. सर्वसामान्य माणसाच्या हातात किल्ल्या आल्या. माध्यमांचे लोकशाहीकरण झाले. प्रत्येकाच्या हातात माध्यम आले. अभिव्यक्तीची संधी सर्वांना मिळू लागली. सोशल मीडियाने तर माध्यमांची प्रस्थापित परिभाषाच बदलून टाकली.


आज अनेकांना आठवणारही नाही, पण आठ – दहा वर्षांपूर्वी अरब क्रांती झाली, तेव्हाचे चित्र काय होते? सोशल मीडियाने ही क्रांती घडवली होती. इजिप्त, ट्युनिशियासह अनेक देशांमध्ये सत्तांतर झाले. लोक रस्त्यावर उतरले, पण अखेरच्या टप्प्यात! त्यापूर्वी सोशल मीडियाने या आंदोलनाला बळ दिले होते. आपल्याकडे अण्णा हजारेंचे आंदोलन असो अथवा निर्भया प्रकरणानंतर पेटलेला वणवा, या सगळ्याला इंधन पुरवले होते ते सोशल मीडियाने. ‘पॉवर ऑफ कॉमन मॅन’ सिद्ध करणाऱ्या या नवमाध्यमाने सामान्य माणसाला आवाज दिला. एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे तोही आपले फोटो पोस्ट करू लागला. व्हाट्सअॅपनं तर हा कोलाहल आणखी वाढवला. मोबाइल नावाच्या प्रकरणानं जादू केली आणि अवघं जग त्यात सामावलं. मोबाइलनं सगळ्या माध्यमांना आपल्या कवेत घेतलं. वर्तमानपत्र असो वा टीव्ही, सिनेमा असो वा वेब सिरीज, लोक मोबाइलमध्येच सगळं बघू लागले, वाचू लागले. आज भारतात सुमारे ऐंशी कोटी लोक मोबाइल वापरतात. त्यामुळंच डिजिटल माध्यमं प्रभावी होत चाललेली दिसतात. पारंपरिक माध्यमंही अधिक लोकाभिमुख होत चालली आहेत. माध्यमांनी सर्वसामान्य माणसांना आवाज दिला हे जसे खरे, अगदी तसेच ‘अॅनेस्थेशिया’ देण्याचा उद्योगही माध्यमांनी आरंभला आहे. व्हायरल होणाऱ्या चुकीच्या गोष्टी कमी नाहीत. खोट्या गोष्टी हेतुतः कशा पसरवल्या जातात आणि त्याचे लाभ कसे घेतले जातात, हे आपण कमी वेळा पाहिलेले नाही. अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प निवडून येताना त्यांनी माध्यमांचा, विशेषतः सोशल मीडियाचा गैरवापर कसा केला, हे अवघ्या जगाने पाहिले. आपल्याकडेही असे घडू शकले. जगाला आवाज देणाऱ्या फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला, तेही आपल्याला माहीत आहे. 


या साऱ्या कोलाहलात ‘दिव्य मराठी’ने निर्माण केलेली विश्वासार्हता अनेकांना थक्क करते. ‘केंद्र में पाठक’ हे भास्कर समूहाचे मूल्य आहे. हे मूल्य संविधानिक आहे. सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा असल्यानेच हे दैनिक लोकांना आपले वाटते. आधुनिक जगाचे अधिष्ठान माहिती आणि ज्ञान आहे, हे खरेच, पण या माहितीचे स्रोत एवढे आहेत की सामान्य माणूस संदिग्ध होऊन जावा! माहितीच्या या महामारीत कोणत्याही घटनेकडे ३६० अंशांत कसे पाहायला हवे, हे ‘दिव्य मराठी’ शिकवतो. ‘न्यूयॉर्क टाइम्स’पासून ते ‘द इकॉनॉमिस्ट’पर्यंत महत्त्वाच्या माध्यमांशी त्यासाठीच आम्ही करार केले आहेत. वाचकाला जग नीटपणे समजायला हवे, तरच तो या जगातील आव्हानांना तोंड देऊ शकतो. शिवाय, मुद्दा फक्त जगाचा अर्थ लावण्याचा नाही. मुद्दा आहे, हे जग बदलण्याचा. त्यामुळेच ‘दिव्य मराठी’ सातत्याने परिवर्तनशील आणि संविधानिक भूमिका घेत वाट चालत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत सारे व्यग्र असताना, दुष्काळाशी महायुद्ध लढत आहे. नकारात्मकतेच्या वावटळीतही ‘मंडे पॉझिटिव्ह’ची सकारात्मकता सेलिब्रेट करत आहे. आणि त्याच वेळी जे गैर आहे, ते ठामपणाने मांडत आहे. सर्वसामान्य माणसांसाठी भांडत आहे. 


‘दिव्य मराठी’ आज घराघरात पोहोचला आहे, याचे मुख्य कारण हे आहे. आमचे नाते प्रत्येक घराशी आहे. कुटुंबाशी आहे.. त्यांच्या आशा- आकांक्षांशी आहे. ‘दिव्य मराठी’ केवळ दैनिक नाही, तुमचं आयुष्य बदलवून टाकेल, असं हे आयुध आहे. म्हणून तर अल्पावधीत महाराष्ट्रानं या दैनिकाला उदंड प्रेम दिलं आहे. आमचे वाचक, लेखक, विक्रेते, जाहिरातदार आणि हितचिंतक यांच्याविषयी आमच्या मनात अपार कृतज्ञता आहे.

 
वाचक हाच आमचा केंद्रबिंदू आहे आणि आम्ही तुम्हाला उत्तरदायी आहोत, या ग्वाहीसह नव्या, नवव्या वर्षात आम्ही पाऊल ठेवत आहोत.
 

बातम्या आणखी आहेत...