Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | The Central Committee will take a final decision about the Congress candidates: Wikhe Patil

काँग्रेस उमेदवारांबाबत अंतिम निर्णय केंद्रीय समितीच घेणार; विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंची माहिती 

प्रतिनिधी | Update - Feb 20, 2019, 08:31 AM IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीमध्ये काही जागांचे निर्णय होणे अद्यापही बाकी आहे.

 • The Central Committee will take a final decision about the Congress candidates: Wikhe Patil

  शिर्डी- राज्यातील ५ ते ६ लोकसभा मतदार संघाबाबात कोणतेही अंतिम निर्णय झालेले नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांबाबत कोणतीही अंतिम यादी तयार झालेली नाही. केंद्रीय समितीच याबाबत अंतिम निर्णय करणार असल्याने तर्कवितर्कातून पुढे येत असलेल्या नावांना कोणताही आधार नाही. जाहीर झालेल्या नावातही बदल होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
  लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या काही उमेदवारांची नावे प्रसिद्ध झाली. याकडे माध्यमांनी लक्ष वेधले असता विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले की, राज्याकडून काही नावांची शिफारस झाली असली तरी ही नावे अंतिम नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीमध्ये काही जागांचे निर्णय होणे अद्यापही बाकी आहे. निवडणूक म्हटली की, राजकीय तर्कवितर्कातून अनेक नावे पुढे येतात. पण कॉंग्रेस उमेदवारांच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून अंतिम निर्णय केंद्रीय समितीच करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.


  ज्यांनी एकमेकांना शिव्या घातल्या. अपमानित केले तेच पुन्हा स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांनी सत्तेतून बाहेर पडण्याच्या असंख्य घोषणा केल्या. मंत्री पदाचे राजीनामेही देणार होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतही निर्णय झाल्याशिवाय युतीची चर्चा नाही, अशी वल्गना उद्धव ठाकरे यांनी केली होती.


  ठाकरेंनी कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची नावे मोजली ?
  भाजपच्या नेत्यांबद्दल खालची पातळी गाठून शिवसेनेचे नेते टीका करत होते. आज मान अपमान गिळून भिकेचे कटोरे घेऊन एकमेकांच्या दारात उभे राहत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर ८९ लाख शेतकऱ्यांची नावे उद्धव ठाकरे मोजून घेणार होते. विरोधी पक्षात बसल्यानंतर ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज मराठवाड्यासाठी त्यांनी मागितले होते. मात्र, यातून त्यांना काही मिळालेच नाही. मात्र, लोकसभेच्या २३ जागा आणि विधानसभेच्या निम्या जागा ठाकरेंनी मोजून घेतल्याकडे विखे लक्ष वेधले.

Trending