आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Central Government Has Asked For A Report Of Violent Incidents From Kerala

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माकप, भाजप-संघ नेत्यांच्या घरांवर बाँब फेकल्याने तणाव; केंद्राने केरळकडून हिंसक घटनांचा अहवाल मागवला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम- केरळच्या सबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून शनिवारी देखील हिंसाचार सुरूच हाेता. कन्नूर जिल्ह्यातील थलसरीमध्ये माकप आमदार ए.एन. शमशीर, पक्षाचे माजी जिल्हा सचिव पी. शशी, भाजपचे खासदार व्ही. मुरलीधरन, भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुमेश व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रशेखरन यांच्या घरावर गावठी बाँब फेकण्यात आले. त्याशिवाय अनेक घरे तसेच दुकानांवर देखील हल्ले झाले. हे हल्ले शुक्रवारी उशिरा रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत सुरू होते. हिंसाचार थांबावा म्हणून सामान्य जनतेला आवाहन करण्यासाठी माकप, भाजप व संघाचे नेत्यांची बैठक सुरू होती. त्याचवेळी हे हल्ले करण्यात आले. 

 

हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केरळकडून अहवाल मागवला आहे. माकप कार्यकर्ता सी.के. विशक यांना सुरीने भोसकून जखमी केले गेले. संघाच्या परियारम येथील कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न केला. या घटनांनंतर कन्नूरसह शेजारी जिल्हे कोझिकोड, मलाप्पुरम व पथानामथिट्टामध्ये तणाव असून विविध घटनांत ७ जण जखमी झाले. राज्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. कन्नूर हिंसेप्रकरणी २६० जणांना अटक झाली. राज्यभरात आतापर्यंत १७०० अटकेत आहेत. 


केरळमध्ये भाजप दंगली घडवतेय : माकप 
माकपचे प्रदेश सचिव कोडियरी बालकृष्णन म्हणाले, केरळमध्ये संघाला दंगली घडवायच्या आहेत. संघ चर्चेस तयार नाही. संघ-भाजप शिक्षण संस्था आपल्या इच्छेनुसार चालवू पाहत आहेत. राज्यातील हिंसाचारातील दोषींवर राज्य सरकार कडक कारवाई करेल. 

 

राज्य सरकारने रचले हिंसेचे षड्‌यंत्र: भाजप 
भाजपचे प्रवक्ते जी.व्ही. एल. नरसिंहराव म्हणाले, राज्य सरकार हिंसाचारासाठी डीवायएफआय, एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांचा वापर करत आहे. सरकारनेच हिंसाचाराचे षड्‌यंत्र रचले. भाविक मंदिराता पारंपरिक पद्धतीने शांततेत आंदोलन करत होते. भाजपचे हे आंदोलन नव्हते. 

 

दर महिन्याला राजकीय नेत्याची हत्या? 
कन्नूरमध्ये गेल्या ४० वर्षांत अनेक राजकीय हत्या झाल्या आहेत. माकप व संघ कार्यकर्त्यांच्या हत्यांसाठी कन्नूर कुप्रसिद्ध आहे. दर महिन्याला कन्नूरमध्ये एका राजकीय नेत्याची हत्या होते, हे वास्तव आहे. ४० गावांतील माकप व संघ कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात नाही. या मुद्द्यावरून राज्यात सरकारची प्रतिमा अत्यंत मलिन झाली आहे. भाजपने सत्ताधारी पक्षावर अनेकवेळा टीका केली आहे. 

 

मंत्री म्हणाले, मुख्य पुजारी ब्रह्मराक्षस! 
केरळ सरकारमधील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री जी. सुधाकरन म्हणाले, एखाद्या बहिणीसमान महिलेशी अपवित्र वर्तन करणाऱ्यास माणूस म्हणता येईल का ? अयप्पा मंदिरातील तंत्री (मुख्य पुजारी) ब्रह्मराक्षस आहेत. एखादा ब्राह्मण राक्षस बनला तर तो खूप धाेकादायक बनतो. पुजाऱ्याचे देवावर प्रेम नाही, असा आरोप सुधाकरन यांनी केला. 

 

डावे व भाजपने हिंसाचार पसरवला : काँग्रेस 
काँग्रेस सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी डावे पक्ष व भाजपवर हिंसाचार पसरवण्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी सरकारला कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यात यश मिळाले नाही. भाजपच्या हिंदुत्ववादी वर्तनास जनतेचे समर्थन नाही, असा आरोपही त्यांनी केला.