आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Challenge Of Ashok Chavan's Victory To Congress And The Challenge Of Retaining The Seat To Shiv Sena

काँग्रेससमोर अशोक चव्हाणांच्या विजयाचे, तर शिवसेनेसमोर जागा टिकवण्याचे आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - विधानसभा  निवडणुकीत काँग्रेससमोर अशोक चव्हाणांच्या विजयाचे आव्हान तर सेनेसमोर आहे त्या जागा टिकवण्याचे आव्हान आहे. भाजपला लोकसभेत मिळालेल्या विजयानंतर जिल्ह्यात आमदारांची संख्या वाढवण्याचे आव्हानही  राजकीय पक्षांसमाेर आहे.  

जिल्ह्यात काँग्रेसचे तीन, सेनेचे चार व भाजप व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपात जिल्ह्यातील ९ पैकी ७ जागा काँग्रेसकडे तर २ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. भाजप-सेेनेच्या जागावाटपात सात जागा शिवसेनेकडे तर दोन जागा भाजपकडे आहेत. राज्यात जरी भाजप मोठा भाऊ असला तरी जिल्ह्यात मात्र शिवसेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. शिवसेनेचे चार आमदार निवडून आले तर भाजपला केवळ एक जागा मिळाली. लोकसभेतील  विजयानंतर भाजपला जिल्ह्यात आमदारांची संख्या वाढवण्याचे वेध लागलेत. किनवट व नायगाव या दोनच जागा भाजपच्या वाट्याला आहेत. जागा वाटपात त्यात वाढ करून आमदारांची संख्या वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.  लोकसभेत नायगाव, देगलूर व मुखेड या मतदार संघात भाजपला मोठी आघाडी मिळाली. नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसला पाच हजार मतांची आघाडी आहे. त्यामुळे या पाच मतदार संघात भाजपला यश मिळू शकते, अशी नेत्यांची धारणा आहे. त्यात अडचण सेनेची आहे. देगलूर, लोहा, नांदेड दक्षिण, हदगाव या चार मतदार संघात २०१४ च्या निवडणुकीत सेना विजयी झाली. लोहाचे आमदार आता भाजपचे खासदार आहेत. परंतु शिवसेनेने या जागांवरचा हक्क सोडला नाही. भाजपच्या जागा कशा वाढवायच्या हे मोठे आव्हान आहे. दुसरीकडे शिवसेनेसमोर चारही जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. भाजप सेनेच्या या चढाओढीत बंडखोरीचीही शक्यता आहे. 
 

काँग्रेससमोर चव्हाणांच्या विजयाचे आव्हान 
काँग्रेससमोर या निवडणुकीत अशोक चव्हाणांचा विजय हे सर्वात मोठे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. चव्हाणांनाही आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक जिंकणे गरजेचे आहे. संपूर्ण राज्यात भाजपने अशोक चव्हाणांनाच मुख्य टार्गेट केले आहे. चव्हाण काँग्रेसचे मासबेस असलेले नेते आहेत. त्यामुळे भाजपने त्यांचा पराभव करणे प्रतिष्ठेचा मुद्दा केले आहे.