आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण काेटा वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती अयाेग्यच : पवारांची मोदींवर टीका 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर- आरक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी घटनेच्या कलम १५ व १६ मध्ये करण्यात येणारा बदल हा संविधानाच्या मूळ तत्त्वालाच छेद देणारा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी माेदी सरकारवर केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाेकांना १० टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर ते काेल्हापुरात पत्रकारांशी बाेलत हाेते. निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मतदारांना खुश करण्यासाठी हा १० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आहे, मात्र आता त्याचा भाजपला काेणताही फायदा हाेणार नाही, असे भाकीतही पवार यांनी वर्तवले. 

 

माजी पंतप्रधान डाॅ. मनमाेहन सिंग यांच्यावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेला 'ठाकरे' चित्रपटही लवकरच प्रदर्शत हाेत आहे. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता 'आगामी निवडणुकांत या चित्रपटांचा काही परिणाम हाेईल असे मला वाटत नाही. कारण चित्रपट पाहून लाेक मतदान करत नाहीत, तर गेल्या ५ वर्षांत सरकारकडून आलेल्या अनुभवाच्या आधारावर लाेक मतदान करत असतात,' असा टाेला पवार यांनी लगावला. 

 

निवडणुकीच्या ताेंडावरचे निर्णय जुमलेबाजी : पवार 
सध्या देशातील जनतेचा मूड बदलत असल्याचे पाहून चिंतेत असलेले माेदी सरकार घाईघाईत काही लाेकप्रिय निर्णय घेत आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही असेच काही निर्णय घेण्याचा प्रयत्न हे सरकार करणार आहे. मात्र साडेचार वर्षांनंतर जनतेची आठवण आल्यानंतर असे निर्णय का घेतले जातात, हे मतदारही चांगलेच जाणतात. असे निर्णय केवळ 'जुमलेबाजी' असतात हे जनता जाणते, असा टाेलाही पवार यांनी माेदी सरकारला लगावला.

 

हसन मुश्रीफ आम्हाला राज्यातच हवेत 
आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. लाेकसभेच्या फक्त ८ जागांबाबत निर्णय बाकी आहे, त्यावरही लवकरच ताेडगा निघेल, असे शरद पवार म्हणाले. काेल्हापूरातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना लाेकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून याच जिल्ह्यातील पक्षाचे दुसरे नेते हसन मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा हाेती. याबाबत पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, 'हसन मुश्रीफांसारखा नेता आम्हाला राज्यात हवा आहे. महाडिक दिल्लीत जातील, मुश्रीफ महाराष्ट्रात राहतील.' 
 

बातम्या आणखी आहेत...