आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायदानाच्या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता वाढवण्याचा प्रयत्न, सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांची ग्वाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : प्रत्यक्ष न्यायदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हा पर्याय कदापिही होऊ शकत नसला तरी न्यायदानाच्या किचकट प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्याचे आपले प्रयत्न राहतील, अशी ग्वाही भारताचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी शनिवारी नागपुरात बोलताना दिली.

सरन्यायाधीशपदावर नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने न्या. बोबडे यांचा हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीच्या परिसरात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यास माजी सरन्यायाधीश आर.एम. लोढा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, सर्वोच्च न्यायालयातील माजी न्या. विकास सिरपूरकर, नागपूर खंडपीठातील प्रशासकीय न्यायाधीश न्या. आर. के. देशपांडे यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती, विधी क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. या सत्कारास उत्तर देताना न्या. बोबडे यांनी माजी सरन्यायाधीश न्या. आर.एम. लोढा यांच्या वक्तव्याचा धागा पकडून न्यायदानाच्या केवळ प्रक्रियेतच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर भर देणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. यासंदर्भात उदाहरण देताना न्या. बोबडे यांनी सांगितले की, अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयापुढे वेगवेगळ्या बाजू मांडणारे हजारो दस्तऐवज आणि कागदपत्रे सादर करण्यात आली होती. अशा वेळी इतक्या मोठ्या प्रमाणातील दस्तऐवजांचा आढावा घेताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर खुबीने करता येऊ शकतो. मात्र, प्रत्यक्ष न्यायदानात मानवी मेंदूची जागा कुठलेही संगणक घेऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यायदानाच्या क्षेत्रात मध्यस्थतेला (मिडिएशन) खूप महत्त्व आहे. दुर्दैवाने कुठल्याही विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमात मध्यस्थतेचा विषय शिकवला जात नाही. मात्र, आता त्यासाठी मुंबई आणि नागपूरसह काही विद्यापीठांना विनंती करण्यात आली आहे, असे न्या. बोबडे यांनी या वेळी सांगितले.

न्याय फार महाग असू नये

वकिलांकडून आकारल्या जाणाऱ्या महागड्या शुल्काबद्दल मला वारंवार प्रसारमाध्यमांकडून विचारले जाते. मला त्यावर बोलता येणार नसले तरी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्याचे मी मानतो. न्याय फार महाग असू नये. तो मिळवणे सर्वांना शक्य व्हायलाच हवे, असे न्या. बोबडे या वेळी म्हणाले. वकिलीच्या व्यवसायात अतिशय कष्टप्रद काम करताना वकीलांनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष पुरविले पाहिजे, असा सल्लाही न्या. बोबडे यांनी या वेळी दिला.

न्यायदानात रिक्त पदांची समस्या : लाेढा

या वेळी बोलताना माजी सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी न्यायदानात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा विचार करताना त्याचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाबींचा विचार झाला पाहिजे, असे परखड मत मांडले. कुठलेही सॉफ्टवेअर पूर्णपणे अचूक यंत्रणा नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. न्यायदानाच्या क्षेत्रात अपुऱ्या पायाभूत सुविधा, रिक्त पदांची समस्या, अपुरा निधी हे चित्र बदलण्याची गरज असल्याचे मतही न्या. लोढा यांनी या वेळी व्यक्त केले. हैदराबाद येथील घटनेनंतर न्या. बोबडे यांनी 'जस्टिस कॅनॉट बी इन्स्टंट' हे अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे विचार मांडल्याचा उल्लेख न्या. लोढा यांनी या वेळी केला.
 

बातम्या आणखी आहेत...