फ्लॅशबॅक / मुख्याध्यापकाच्या स्कूटरवर बसून सभास्थानी पाेहाेचले मुख्यमंत्री

लातूर मतदारसंघातील १९७२ च्या निवडणुकीत वसंतराव नाईक यांची अाठवण, हेलिकाॅप्टर दुसरीकडेच उतरल्याने करावी लागली धावपळ
 

दिव्य मराठी

Sep 25,2019 09:19:00 AM IST

सचिन काटे

औरंगाबाद - निवडणुकीची धामधूम सुरू असते... मुख्यमंत्री प्रचाराला येणार असतात... नेतेमंडळी स्वागतासाठी वाट पाहतात अन‌् अचानक निरोप येतो, ‘साहेब सभास्थळी स्कूटरवर पोहोचलेत.’ १९७२ चा विधानसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघात घडलेला हा प्रसंग. रेल्वेच्या धुरामुळे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे हेलिकॉप्टर सभास्थानाएेवजी एका शाळेच्या मैदानात उतरवले गेले, आणि त्यांना स्कूटरवर सभास्थळी जावे लागले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव देशमुख यांनी सांगितलेली ही आठवण नाईकांच्या ‘महानायक’ या गौरवग्रंथात नमूद आहे.

१९७२ मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघातून शिवराज पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी वसंतराव नाईक येणार होते. त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर केली होती. मुख्यमंत्री नाईक प्रथमच लातूरमध्ये येत होते. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती. त्यांचे हेलिकॉप्टर लातूरजवळ आले, त्या वेळी लातूर- बार्शी मीटरगेज रेल्वेलाइनवर कोळशाच्या इंजिनावर धावणारी गाडी जाण्याची वेळ झाली हाेती. आधी इंजिन सुरू केले जायचे. त्यातून प्रचंड धूर निघायचा. हेलिकॉप्टर उतरवण्याची खूण म्हणून पण त्या काळी धूर केला जायचा. या रेल्वेच्या इंजिनचा धूर पाहून हेलिकॉप्टर इथेच उतरवायचे आहे, असे पायलटला वाटले आणि त्याने नाईक यांचे हेलिकाॅप्टर चुकीच्या ठिकाणी म्हणजे शाळेच्या मैदानावर उतरवले. त्या वेळी शाळा सुरू होती, मात्र मैदान रिकामे होते. नाईकसाहेब खाली उतरले तेव्हा मुख्याध्यापक समोर आले. ‘तुमचे हेलिकॉप्टर उतरवण्याची जागा दयानंद महाविद्यालयात आहे,’ असे त्यांनी सांगितले. त्यावर नाईक म्हणाले ‘आता काय करायचे..’ त्या मुख्याध्यापकांकडे स्कूटर होती, त्यावर बसून नाईक निघाले. स्वत: मुख्याध्यापकांना मुख्यमंत्र्यांचे सारथ्य करण्याची संधी मिळाली. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. उमेदवार शिवराज पाटील, पंचायत समितीचे उपसभापती विलासराव देशमुख यांच्यासह सगळे पदाधिकारी सभास्थळी धावले. पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. तेव्हा नाईक म्हणाले, "दिलगिरी कशाला ! बऱ्याच वर्षांनी स्कूटरवर बसायला मिळाले.’

X
COMMENT