आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री सत्तासंघर्षात व्यग्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तासंघर्षात व्यग्र असून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी तसेच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी मंगळवारी नागपुरात बोलताना केली.


केंद्रातील मोदी सरकारच्या कथित गैरकारभाराविरुद्ध काँग्रेसच्या वतीने आजपासून सुरू झालेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खेडा यांनी नागपुरात काँग्रेसची भूमिका मांडली. १५ नोव्हेंबरपर्यंत आंदोलन चालणार असून त्यात पक्षाच्या वतीने सरकारचे चुकीचे आर्थिक धोरण, बेरोजगारी, नोकऱ्यांवरील संकट, शेतकऱ्यांचे संकटाचे विषय मांडले जाणार असल्याचे खेडा यांनी सांगितले. राज्यातील सत्तासंघर्षावर इतर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार देताना खेडा यांनी राज्यात स्थिर सरकार यावे, एवढीच अपेक्षा व्यक्त केली. सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शिवसेनेला पाठिंबा देणार काय, या प्रश्नासह सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातील राजकीय चर्चेवर बोलण्यास खेडा यांनी नकार दिला. महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे स्थिती निर्माण होणे शक्य नसल्याचे सांगत खेडा म्हणाले की, पक्ष बदलल्यावर नुकसानच होते. जनता माफ करत नाही, हे नेत्यांना समजून चुकले आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचा फोन हॅक झाल्याचा प्रकरणात सरकारकडे कुठलेच उत्तर नाही, असा दावा खेडा यांनी केला. फोन हॅक करण्याचे सॉफ्टवेअर सरकारी एजन्सीलाच िदले जाते असे एनएसओ या इस्रायली कंपनीने न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे सरकारनेच आता देशात कोणाकोणाचे फोन टॅप करण्यात आले, याचे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी खेडा यांनी यावेळी केली. आरसीईपी करारावर स्वाक्षऱ्या न करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हे शेतकरी आणि विरोधी पक्षांनी आणलेल्या दबावाचे यश असल्याचे खेडा यांनी यावेळी सांगितले.

देश वाईट परिस्थितीतून जातोय
पोलिसांनी धरणे देण्याच्या राजधानी दिल्लीतील अभूतपूर्व घटनेचा उल्लेख करताना खेडा यांनी देश अत्यंत वाईट परिस्थितीतून जात असल्याचा उल्लेख केला. देशाची अर्थव्यवस्था कधी नव्हे ती धोक्यात आली आहे. बेरोजगारीचे प्रमाण भरमसाट वाढत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्या आत्महत्यांचे आकडे दडपण्याचे प्रयत्न सरकारकडून होत आहेत. औद्योगिक गुंतवणुकीचे प्रमाण मागील १६ वर्षांच्या न्यूनतम स्तरावर आले आहे, याकडे खेडा यांनी लक्ष वेधले.