आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Chief Minister's 501 Facebook Pages, A Core Team Of 12 People In The War Room

मुख्यमंत्र्यांची 501 फेसबुक पेजेस, वाॅर रूममध्ये 12 जणांची कोअर टीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : एकनाथ खडसे, काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक बडे नेते आपापल्या मतदारसंघात अडकलेले असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, संपूर्ण राज्याचे लक्ष असलेला नागपूर दक्षिण-पश्चिम हा स्वत:चा मतदारसंघ सहकाऱ्यांवर सोपवून मुख्यमंत्री निर्धास्तपणे संपूर्ण राज्यात प्रचारात व्यग्र आहेत. याला कारण भाजपाची भक्कम तटबंदी असलेली प्रचार यंत्रणा आहे.

असा आहे मुख्यमंत्र्यांचा हायटेक प्रचार
रणजित आडे यांच्या नेतृत्वात २० जणांची आयटी टीम सतत कार्यरत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तब्बल ५०१ फेसबुक पेजेस तयार करण्यात आली आहेत. त्यावर सतत त्यांच्याविषयीचा मजकूर टाकण्यात येतो.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात झालेल्या कामांची माहिती दिली जाते. याशिवाय इन्स्टाग्राम, ट्विटरवर संदेश दिले जातात. ३७८ बूथप्रमुखांना रीतसर प्रशिक्षण देऊन त्यांना थर्मल प्रिंट असलेल्या मशीन्स दिल्या आहेत.

या मशीन्स जीपीएसने जोडण्यात आल्या आहेत. यामुळे कोणत्या बूथवर किती प्रती निघाल्या, किती घरी संपर्क झाला याची इत्थंभूत माहिती वाॅररूममधील नियंत्रण कक्षात कळते.

प्रभागातील कामांनुसार पोस्टर्स
प्रभागानुसार कामे वाटून देण्यात आली आहेत. कामांनुसार पोस्टर्स तयार करून लावली जातात. कार्यकर्त्यांचे प्रभागानुसार व्हाॅट‌्सअॅप ग्रुप आहेत. प्रत्येक दोन ते तीन बूथमागे एक आयटी निरीक्षक नेमला आहे. त्याचे प्रभागातील कामकाजावर लक्ष राहील. कोणता कार्यकर्ता कोणत्या वेळी कुठे राहील याचे वेळापत्रक ठरलेले आहे. त्यानुसार काम होत आहे की नाही, हे पाहणे आयटी निरीक्षकाचे काम आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आयटी सेलचे काम सुरू राहते.

रोज दहा किमी पदयात्रा
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्यावर मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी आहे. घरोघरी संपर्क साधणे, पत्रके आणि मुख्यमंत्र्यांच्या कामांची माहितीपुस्तिका वितरित केली जाते. पदयात्रा, कोपरा सभांद्वारे जनसंपर्क सुरू आहे. रोज सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास पदयात्रेद्वारे जनसंपर्क केला जातो. दहा किमी पदयात्रा होते. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ७० टक्के घरी संपर्क करण्यात आला. ९ जणांची कोअर कमिटी संपूर्ण कार्यक्रमांचे नियाेजन करते. ७ प्रभागाला सात प्रभारी निवडणूक प्रमुख व संयोजक नेमण्यात आले आहेत.