CM post / मुख्यमंत्र्यांचे काम कारकुनासारखे, आपल्याला नाही पटत : उदयनराजे

मुख्यमंत्रीपदाबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर खुलासा
 

प्रतिनिधी

Jun 14,2019 10:36:00 AM IST

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले असतील, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, खुद्द उदयनराजेंनी मात्र या पदाबाबत खळबळजनक वक्तव्ये केली आहेत. मुख्यमंत्र्यांचे काम हे चार भिंतींत बसलेल्या कारकुनासारखे असते. त्यांना फक्त प्रशासन सांभाळायचे असते. पण, आपल्याला चार भिंतींत बसणे नव्हे, तर मुक्त फिरणे आवडते, अशी भूमिका त्यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत मांडली.

तेव्हाच त्यांनी या पदासाठी विचार करायला हवे होते

या पदासाठी होत असलेल्या त्यांच्या नावाच्या चर्चेबाबत त्यांनी दिलखुलास उत्तरे देत पक्षावर आगपाखडही केली आहे. ते म्हणाले, १५ वर्षांपूर्वी केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे आघाडीची सत्ता होती. तेव्हाच त्यांनी या पदासाठी विचार करायला हवे होते. आता या पदालायक कुणी उपलब्ध नाही. म्हणून माझे नाव पुढे येणे योग्य नाही, अशी आगपाखाड करत आपल्याला मुक्त फिरायला आवडते. मात्र, मुख्यमंत्री कार्यालय जर “कास’ला हाेणार असेल तर आपण या पदाचा विचार करू, अशी विनाेदी जाेडही त्यांनी दिली.


राष्ट्रवादीला घरचा आहेर
नीरा देवधर धरणाचे पाणी गेली १५ वर्षे खंडाळा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांना का दिले नाही? हे पाणी रोखण्याचे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचे ज्यांनी काम केले त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा शब्दांत उदयनराजेंनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे. विशेष म्हणजे, आघाडी सरकारच्या आदेशानुसारच हे पाणी १२ वर्षांपूर्वी बारामतीकडे वळवण्यात आले होते. हे पाणी बंद करण्याचे आदेश नुकतेच राज्य सरकारने काढले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने हे सुडाचे राजकारण असल्याचा दावा केला आहे.

X
COMMENT