आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Chief Of Defence Staff Will Serve As The Chief Military Adviser To The Government, Will Be Four Star General

'सरकारचे मुख्य लष्करी सल्लागार म्हणून काम करणार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशाच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या (सीडीएस) सेवेबाबतच्या नियम-अटी जारी केल्या आहेत. सीडीएसचे पद चारतारांकित जनरलप्रमाणे राहील, असे मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत निश्चित करण्यात आले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, सीडीएस हे सरकारचे मुख्य लष्करी सल्लागार राहतील. तिन्ही दलांचे प्रमुख पूर्वीप्रमाणेच आपल्या क्षेत्राशी संबंधित प्रकरणात संरक्षणमंत्र्यांना सल्ला देतीलच. सीडीएस तिन्ही दलांशी संबंधित मुद्द्यांवर सरकार आणि लष्करी दलांच्या मध्यस्थाप्रमाणे काम पाहतील. या पदावर नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यावर लष्कराच्या तिन्ही दलांत कामाबाबत समन्वय साधणे, या तिन्ही दलांच्या कामाशी संबंधित आर्थिक बाबींबाबत सल्ला देणे अशी जबाबदारी राहील. सीडीएसच्या नेतृत्वाखाली वायुदल, लष्कर आणि नौदल यांच्याकडे असलेल्या संसाधनांचा पुरेपूर वापर होण्यासाठी सैन्य कमांडची फेररचना केली जाऊ शकते.

कारगिल युद्धानंतर पदाची निर्मिती

१९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर स्थापन झालेल्या समितीने सर्वप्रथम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करण्याची मागणी केली होती. कारगिल युद्ध घडले त्या वेळी सुरक्षेमध्ये नेमक्या काय त्रुटी राहिल्या, पुढच्या वेळी काय सुधारणा कराव्या लागतील त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती.