आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचा अंत्यविधी पार पडण्यापूर्वीच निघून गेला होता मुलगा, काही दिवसांतच सापडला त्याचा मृतदेह, कारण समोर आल्यावर प्रत्येकाचे डोळे पाणावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आईच्या मृत्यूमुळे दुःखात असलेला तरुण अत्यंसंस्कारापूर्वीच घर सोडून गेला होता. या तरुणाने २० नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. खिशात असलेल्या आधारकार्डवरुन त्याची ओळख पटवण्यात येऊन मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला. गुरुवारी रात्री शाेकाकुल वातावरणात या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात अाले.


चंद्रशेखर नाना ठाकूर (वय ३७, रा. बंधन बँकेजवळ, मुक्ताईनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ८.४५ वाजता चंद्रशेखर यांच्या आई निर्मला ठाकूर यांचे निधन झाले होते. या दुःखामुळे चंद्रशेखर यांनी प्रचंड आक्रोश केला. आईच्या मृतदेहाजवळ बसून ताे जोरजोरात रडत असल्यामुळे त्याचीही प्रकृती खराब होऊ नये म्हणून नातेवाइकांनी त्यांना एका बाजूस बसवले. त्यानंतर नातेवाइकांनी फोन करुन निर्मला ठाकूर यांच्या निधनाची माहिती इतरांना दिली.

 

ही लगबग सुरू असताना बाजूला बसलेला चंद्रशेखर हा दुपारी १२ वाजता कोणालाच काही न सांगता गर्दीतून निघून गेला. बराचवेळ शोध घेतल्यानंतर चंद्रशेखर मिळून न आल्यामुळे नातेवाइकांनी निर्मला ठाकूर यांचा अंत्यविधी पार पाडला. त्यानंतर शहरातील नातेवाइकांकडे चंद्रशेखरचा शोध घेतला; पण ताे मिळून आला नाही. या प्रकरणी मेहुणे महेंद्र रमेश ठाकूर (वय ४३, रा. मोहननगर) यांनी १८ नोव्हेबर जिल्हापेठ पोलिसात दिलेल्या खबरीवरून हरवल्याची नोंद झाली होती. दरम्यान, चंद्रशेखर हा घरातून निघून नाशिक जिल्ह्यात गेला होता. तेथे दिंडोरी तालुक्यातील एका शेतात त्याने दोन्ही हाताच्या मनगटावरील नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता, चंद्रशेखरच्या खिशात आधारकार्ड मिळून आले.

 

त्यावरुन पोलिसांनी जळगाव पोलिसांना संपर्क साधला. ओळख पटल्यानंतर कुटंुबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी चंद्रशेखरचा मृतदेह जळगावात आणून अंत्यसंस्कार केले. पत्नी व एकुलत्या मुलाच्या मृत्यूने वडील नाना ठाकूर यांना प्रचंड धक्का बसला अाहे.


नातेवाईक, वडिलांना शाेक अनावर
चंद्रशेखर हा ठाकूर दांपत्याचा एकुलता एक वारस होता. त्याचे लग्नही झालेले नव्हते. आई निर्मला ह्या मृत्यूपूर्वी खूप आजारी होत्या. या वेळी घरात एकटेच असलेल्या चंद्रशेखरने आईची सुश्रूषा केली होती. आजारातून बरे करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करूनही बरी न झाल्यामुळे चंद्रशेखर खचला हाेता. याच दु:खात त्याने सुरुवातीला घर सोडले आणि पाच दिवसांत आत्महत्या केली. माय-लेकांच्या दुर्दैवी निधनामुळे नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांतून प्रचंड हळहळ व्यक्त हाेत अाहे.
प्रबोधननगरच्या बेपत्ता वृद्धाने केली निमखेडी शिवारात अात्महत्या
प्रबोधननगरातील ६७ वर्षीय वृध्द आठ दिवसापासून बेपत्ता होते. शुक्रवारी त्यांनी निमखेडी शिवारातील पटेल फॅक्टरीलगत पडीत खोल्यांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.

 

गुलाब गोविंदा लोहार असे मृत वृद्धाचे नाव आहे. लोहार हे १६ नोव्हेंबर रोजी दुपारी कुणालाही न सांगता घरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा विलास लोहार याने तालुका पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी दुपारी ११ वाजता निमखेडी शिवारातील पटेल फॅक्टरी कंपाऊंडच्या लगत पडक्या खोल्यांमध्ये लाकडी दांड्याला त्यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले.
 

याप्रकरणी पोलिस पाटील प्रकाश पाटील यांच्या खबरीवरून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी नेमका कधी गळफास घेतला याची माहिती मिळू शकली नाही; पण मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. यामुळे घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे राजेंद्र बोरसे हे या घटनेचा तपास करीत आहेत

बातम्या आणखी आहेत...