आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू करा'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : राष्ट्रपती राजवटीच्या कचाट्यात सापडलेला मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तत्काळ सुरू करून गरीब रुग्णांना आर्थिक साहाय्य द्यावे, या मागणीचे पत्र शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी राज्याचे मुख्य आयुक्त अजोय मेहता यांना शुक्रवारी दिले. हा कक्ष तत्काळ सुरू करावा, अन्यथा शिवसेना स्टाइलने तो सुरू करण्यात येईल, असा इशारा सामंत यांनी दिला, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेऊन राज्यपाल कार्यालयातर्फे या निधीचे संकलन करून रुग्णांना मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. हा कक्ष बंद असल्याचे वृत्त दै. दिव्य मराठीने शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केले हाेते.


मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून गरीब रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली जात होती. धर्मदाय न्यास असलेल्या या कक्षाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर हा कक्ष बंद करण्यात आला. परिणामी राज्यभरातील ६ हजार रुग्णांचे अर्ज मदतीविना बासनात गुंडाळण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी याबाबत गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून हा कक्ष पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपाल कार्यालयातून निधी संकलित करून रुग्णांना मदत सुरू ठेवण्याची विनंती केली. दुसरीकडे शिवसेनाही या मुद्द्यावर अाक्रमक झाली आहे.

काँग्रेसचेही निवेदन
राज्यातील गरीब जनतेचा आधार ठरलेला मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सध्या बंद करण्यात आल्याने हजारो गरीब, गरजू रुग्णांचे हाल होत आहेत. राष्ट्रपती राजवट लागू होऊन मंत्रालयातील हा कक्षही बंद झाल्याने गरीब रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. हा कक्ष पुन्हा सुरू करावा, अशी विनंती माजी विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालांकडे केली आहे.

प्रलंबित अर्जांची संख्या वाढली
स्वतंत्र धर्मादाय न्यास असलेल्या या कक्षाच्या वतीने देणगीदारांकडून निधी संकलित करून गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी देण्यात येतो. परवडू न शकणाऱ्या खर्चिक उपचारांसाठी राज्यभरातील हजारो रुग्णांचे अर्ज या कक्षाकडे प्रलंबित आहेत. वर्षभरापासून हा निधी आटल्याने प्रलंबित अर्जांची संख्याही वाढली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर हा कक्षच बंद करण्यात आल्यानंतर या रुग्णांच्या समस्यांत वाढ झाली आहे.