आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीचे सरकार आले तरी टिकणार नाही; राज्यात भाजपचेच सरकार शक्य : फडणवीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप आमदारांच्या बैठकीत हास्यविनाेदात रमलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. - Divya Marathi
भाजप आमदारांच्या बैठकीत हास्यविनाेदात रमलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील.

मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते सत्तास्थापनेसाठी एकत्रित प्रयत्न करत असताना भाजपनेही गुरुवारी रात्री आपल्या पक्षाच्या आमदारांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक झाली. 

‘राज्यात तीन पक्षांचे सरकार येऊच शकत नाही, आले तरी सहा महिन्यांच्या वर टिकणार नाही. त्यामुळे राज्यात केवळ भाजपचेच किंवा भाजपच्या सहकार्यानेच सरकार स्थापन हाेऊ शकते, अशी राजकीय स्थिती आहे. त्याचा निर्णय योग्य वेळी पक्ष घेईल. त्यामुळे पक्षाच्या आमदारांनी मुंबईत थांबण्याची गरज नाही. त्यांनी जनतेत जावे, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, त्यांना दिलासा देऊन मदत करा. शेतकऱ्यांना भक्कम मदत मिळेल, हे सुनिश्चित करा. सत्तेसाठी भाजप काम करीत नाही, तर जनतेसाठी काम करणे, हे आपले पहिले लक्ष्य आहे,’ असे आवाहन फडणवीस यांनी केले. 

भाजपच्या १०५ आमदारांसोबतच, भाजपला समर्थन देणाऱ्या पक्षाचे तसेच अपक्ष आमदारही या बैठकीला उपस्थित हाेते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला सध्याच्या राजकीय परिस्थितीबरोबरच राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत पोहोचवण्याबाबतच्या कार्यक्रमाची चर्चा झाली. तसेच भाजपच्या पक्षांतर्गत म्हणजेच संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने ९० हजार बुथनिहाय केंद्रावर काम करण्याची रणनीतीही ठरवण्यात आली. राज्यात सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाट्यावर आमचे लक्ष असेल,’ असे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. 

भाजपचे नेते शिवसेनेच्या प्रचाराला गेले, मात्र शिवसेनेचे नेते आमच्या प्रचाराला आलेच नाहीत : देवेंद्र फडणवीस


> 1  भाजपला अतिशय भक्कम यश या निवडणुकीत प्राप्त झाले. प्रत्येक विभागात सर्वाधिक यश, सर्व समाजघटकांना प्रातिनिधित्व प्राप्त झाले. भाजपचा मोठा सहभाग असल्यानेच मित्रपक्षांच्या जागा अधिक आल्या.


> 2 भाजपचे नेते शिवसेनेच्या अनेक विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी गेले. पण शिवसेनेचा एकही नेता भाजप उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारासाठी आलेला नाही.


> 3 शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा, त्यांना दिलासा द्या, त्यांना मदत करा. 


> 4  संघटना वाढीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. भविष्यातील आपले ध्येय हेच असले पाहिजे.


> 5 नेतृत्वाचा आमदारांवर विश्वास असलेला एकमेव पक्ष  म्हणजे भाजप आहे. म्हणूनच आम्ही  आमचे आमदार कुठे पाठवले नाही. त्यामुळे बहुतेक आमदारांनी नेतृत्वाचे आभार मानले.