आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद : राज्यात थंडीची चाहूल लागत असून या आठवड्यात पारा चांगलाच घसरण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात डिसेंबर-जानेवारीत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. सध्या नाशिक, जळगाव, धुळे, नगर, पुणे, औरंगाबादसह विदर्भातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात घट होऊन चांगली थंडी जाणवत आहे. मंगळवारी अहमदनगर येथे राज्यातील सर्वात कमी १२.५ अंश तापमानाची नोंद झाली.
सध्या उत्तर व ईशान्य भारतात हवेचे दाब वाढलेले आहेत. तर दक्षिण भारतात हवेचे दाब कमी आहेत. त्यामुळे हवा उत्तर आणि ईशान्येकडून दक्षिणेकडे वाहते आहे. सध्या वायव्य भारतात पश्चिमी विक्षोभामुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) हिमालयाच्या भागात बर्फवृष्टीसह कडाक्याची थंडी पडलेली आहे. उत्तरेकडील हे थंड वारे दक्षिणेकडे वाहत असल्याने राज्यात थंडी वाढणार आहे. आयएमडीच्या पुणे कार्यालयातील हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले, पाच डिसेंबरपर्यंत देशात किमान तापमान सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने जास्त राहील. सध्या देशातील अनेक भागात कमाल तापमान मात्र सरासरीपेक्षा कमी आहे. दक्षिण महाराष्ट्र वगळता राज्यात पाच डिसेंबरनंतर तापमानात घसरण होईल.
या वेळी हिवाळा कसा राहील ?
डॉ. साबळे : राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील किमान तापमान घसरण्यास सुरुवात होईल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यात पारा घसरेल. जानेवारीत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. या वेळी फेब्रुवारीपर्यंत कडाक्याची थंडी राहील. मार्चमध्ये सौम्य हिवाळा राहील.
हिवाळा केव्हा सुरू होईल ?
डॉ. साबळे - उत्तर भारतात २०१९च्या मार्चपर्यंत हिवाळा होता. या वर्षीही असेच चित्र राहील. खरा हिवाळा डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जाणवेल. राज्यातील किमान तापमान १ ते ३ अंशांनी घसरेल. जानेवारीत किमान तापमान ३ ते ४ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.
यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी जाणवेल का ?
डॉ. साबळे - नाही, पावसाचा आणि थंडीचा फारसा संबंध नाही. खूप पाऊस झाला तर खूप थंडी पडते हा समज आहे, मात्र त्यास शास्त्रीय आधार नाही.
थंडी वाढण्याची कारणे काय ?
डॉ. साबळे - सध्या उत्तर भारतात हवेचे दाब १०१६ हेप्टा पास्कलपर्यंत वाढलेले आहेत. त्यामुळे तेथील पारा घसरत आहे. दक्षिण भारतात याच वेळी कमी दाब आहे, त्यामुळे उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे येण्यास सुरुवात झाली आहे.
उत्तरेकडील वाऱ्यांचा महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होतो ?
डॉ. साबळे - उत्तरेकडे हवेचे दाब वाढले की राजस्थान आणि वायव्य भारतातील थंड वारे कमी दाबाकडे वाहतात. त्याचा एक रोडमॅप तयार होतो. राज्यातील मालेगाव, जळगाव, धुळे, पुणे, नगर, नाशिक ही शहरे या थंड वाऱ्याच्या मार्गात असल्याने तेथील पारा घसरतो. राज्यात थंडी पसरते. तर पूर्वेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याने विदर्भ गारठतो.
यंदा रब्बीचा हंगाम कसा राहील ?
डॉ. साबळे - यंदा रब्बीची पिके चांगली येतील. मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात राज्यात चांगला पाऊस झाल्याने जमिनीत चांगला ओलावा आहे. त्याचा लाभ या पिकांना होईल.
थंडीचा पिकांवर काय परिणाम होईल?
डॉ. साबळे - फारसा नाही. मात्र हरभरा, गव्हासारख्या पिकांत दाणे भरण्याच्या अवस्थेत किमान तापमान खूपच कमी राहिले तर अडचण येऊ शकते. धुके, दव जास्त काळ पडल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
उत्तर महाराष्ट्रात पारा घसरणार
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमानात जास्त घसरण दिसणार नाही. सध्या देशाच्या पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या हवेचे प्रवाह अद्याप फारसे सुरळीत झालेले नाहीत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचे प्रवाह सुरळीत होतील आणि राज्यातील पारा घसरेल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यात सध्या थंडी जाणवेल. -डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख, हवामान विभाग, आयएमडी, पुणे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.