आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Conflict In Congress Is Unfortunate When A Competent Opposition Party Is Needed

सक्षम विराेधी पक्षाची गरज असताना काँग्रेसमधील द्वंद्व दुर्दैवी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसमध्ये पुन्हा चैतन्याचे स्फुल्लिंग चेतवण्याची जबाबदारी ७२ वर्षीय सोनिया गांधी यांच्यावरच साेपवली जाणे हे पक्षाच्या असहायतेचे निदर्शक ठरते. काँग्रेसला असहायतेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा हे स्वपक्षातच सतत संघर्ष करीत हाेते. संकुचितपणा, गुदमरून टाकणारी आैपचारिकता आणि लब्धप्रतिष्ठित संस्कृतीमध्ये रमलेल्या पक्षात नवी संस्कृती रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सहकाऱ्यांनीच निरर्थक ठरवला. इतकेच नव्हे तर नव्या काळातील आव्हानांचा राेखठाेक सामना करण्याएेवजी दरबारी काँग्रेसजनांनी खिडक्या, दरवाजे बंद करण्याचा पवित्रा घेतला. काँग्रेसमध्ये अंदाधुंदीचे वातावरण असतानाही लाेकसभा निवडणुकीत देशभरातून मिळालेली १२ काेटी मते आणि या मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर भराेसा ठेवावा वाटला नाही. ज्या काळात सक्षम विराेधी पक्षाची सर्वाधिक गरज असते, त्याच वेळी सर्वात माेठा इतिहास असलेल्या पक्षात माजलेले द्वंद्व म्हणजे दुर्दैवच ठरावे. राजकीय संतुलन आणि काही अनपेक्षित प्रसंगांच्या अनुषंगाने विराेधकांचा आवाज महत्त्वाचा ठरताे, ताेच क्षीण हाेत असेल तर केवळ लाेकशाहीच्या स्वास्थ्यासाठी म्हणूनच नव्हे, तर सरकारसाठीदेखील याेग्य नव्हे.  साेनिया गांधींनी २० वर्षांपूर्वी काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त करून देत, सत्ता मिळवून दिली हे खरे. उल्लेखनीय म्हणजे आजही ‘भावना विरुद्ध मूलभूत मुद्दे’ याचेच आव्हान आहे. स्वॅग, स्कूल आॅफ पाॅलिटिकल वाॅरफेअर, शक्तिमान केडरसारख्या नव गुरुत्वाकर्षण शक्तीचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला गांधी या टॅगपासून मुक्त करण्याचा इरादा राहुल आणि प्रियांका गांधी वारंवार व्यक्त करीत हाेते, त्याचा हा परिणाम काँग्रेसला इंधन पुरवणार की भाजपला?  साेशल मीडियाच्या वाढत्या विस्तारामुळे वायुवेगाने लाेकधारणा बनते आणि बिघडते. या बहुआयामी सुनामीतून पार हाेण्यासाठी काँग्रेसच्या नाैकेला परिणामकारक प्रभावक्षमतेची गरज आहे. काँग्रेसमध्ये केवळ वैचारिक मतभिन्नता आहे असेच नव्हे, तर बिगर गांधी नेतृत्वाच्या पर्यायाचा दुष्काळही खायला उठला आहे. अर्थात पक्षाला परावलंबी बनवण्याची भूमिका हे गांधी परिवाराचेच देणे आहे. कलम ३७० च्या मुद्द्यावर काँग्रेसमधील वैचारिक विभाजन ज्या पद्धतीने उघड झाले, ते पाहता साेनियांच्या सावलीत काँग्रेसचे राेपटे कितपत तग धरू शकेल आणि पक्ष जनतेचा किती विश्वास संपादन करू शकेल, हे माेठे आव्हान आहे. काँग्रेसला युवा नेतृत्व लाभावे या भूमिकेचा पुरस्कार करणारे कॅप्टन अमरिंदरसिंग आणि अन्य नेते तूर्त चिंताक्रांत नसतील तरच नवल!