आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - स्त्यावर नियम मोडल्यानंतर दंड न भरलेले वाहन परिवहन कार्यालयात जमा केले. परंतु, हे वाहन घेऊन जाण्यासाठी वाहनधारक फिरकलाच नाही, तर दररोज ५० रुपये याप्रमाणे वाहनचालकाला पार्किंगचे पैसे भरावे लागणार आहेत. जमा केलेल्या दंडाची रक्कम सात दिवसांत भरून वाहन घेऊन जाण्याचा नियम आहे. मात्र, काही वाहनधारक सहा-सहा महिने कार्यालयात फिरकत नाहीत. त्यामुळे कार्यालयाला भंगाराच्या दुकानाचे स्वरूप येते. याचा परिणाम म्हणून आता महामंडळाच्या सरकारी कार्यालयांप्रमाणे वाहनधारकांना दंड आकारण्याची परवानगी आरटीओ कार्यालयाने शासनाकडे केली आहे. त्यामुळे पार्किंगचा दंडही वाहनमालकांना भरावा लागणार आहे. किमान दंडाच्या धाकाने तरी वाहनमालक वाहने लवकर घेऊन जातील अशी अपेक्षा आहे.
आरटीओच्या पथकाने विश्वंभर नवगिरे यांची रिक्षा (एमएच २० एए ३२४८) पकडली. कागदपत्रे नसल्याने ७ हजारांचा दंड आकारून ती चिकलठाणा येथील एसटी वर्कशॉपमध्ये उभी केली. नवगिरे यांनी चार महिन्यांनंतर आरटीओचा दंड भरला आणि रिक्षा घेऊन जाण्याचे रीतसर आदेश घेतले. एसटी वर्कशॉपमध्ये पोहोचल्यानंतर मात्र रिक्षाच्या पार्किंगसाठी तब्बल १८ हजार ८०० रुपयांचा दंड आकारल्याचे समोर आले. जर ही रिक्षा आरटीओने त्यांच्या कार्यालयात किंवा पोलिस ठाण्यात उभी केली असल्यास दंड भरण्याची गरज नव्हती.
वाहनधारकांचा निष्काळजीपणा
हीच बाब हेरून अनेक जण आरटीओ व पोलिस ठाण्यात कारवाई करून उभे केलेले वाहन सहा-सहा महिने नेण्यासाठी येत नाहीत. परिणामी सरकारी जागेवर मोठा अडथळा निर्माण होताे आणि रोजच्या कारवाईत मोठी अडचण निर्माण होते. वाहनधारकांना कारवाईनंतर आपली वाहने वेळेत दंड भरून नेण्यासाठी आरटीओ कार्यालयाने परिसरात लावण्यात येणाऱ्या वाहनांनादेखील दंड आकारण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे, जेणेकरून दंडाच्या धाकाने परिसरात होणाऱ्या वाहनांची गर्दी कमी होईल असा उद्देश आहे.
१२ किमीचा नियम
आरटीओ कार्यालयाच्या १२ किमी अंतरापलीकडे वाहनांवर कारवाई केल्यास ती वाहने मुख्य कार्यालयात नेता येत नाहीत असा नियम आहे. त्यामुळे अशी वाहने जवळच्या महामंडळ कार्यालयात सील केली जातात. सात दिवसांनंतर अशी वाहने उभी राहिल्यास प्रतिदिन ५० रुपये दंड वसूल करण्याचा नियम आहे. हा नियम अनेक वाहनधारकांना माहिती नसल्याने वाहन कारवाईच्या दंडापेक्षा तीनपट अधिकची रक्कम भरावी लागते. कधी कधी ही दंडाची रक्कम वाहनाच्या किमतीपेक्षा अधिक होते. परिणामी ही वाहने मालक नेत नाहीत. त्यामुळे एसटी वर्कशॉपमध्ये १३४ वाहने गेल्या चार वर्षांपासून पडून आहेत. त्यामुळे एसटी वर्कशॉप हा भंगाराचा अड्डा झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.