आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीचे भूत कायम: बोंडअळीचे पतंग अमरावती जिल्ह्यात तिपटीहून अधिक आढळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- डिसेंबर महिन्यातच शेंदरी बोंडअळ्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आगामी हंगामातही बोंडअळीचे भूत कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकरी व जीन मालकांनी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्याचे आवाहन प्रादेशिक संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांना जबर फटका बसण्याचा इशारा केंद्राचे वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे यांनी दिला आहे. 

 

मागील वर्षी बोंड अळीने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. त्यानंतर चालू हंगामाच्या सुरवातीलाही बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. परंतु अनुकूल वातावरण निर्माण न झाल्याने यावर्षी बोंडअळीला कमालीचा आळा बसून शेतकऱ्यांना कपाशीचे समाधानकारक उत्पादन होऊ शकले. त्यातच कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या समन्वयातून वेळोवेळी घेतलेल्या कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत जागृती करण्यात आली आणि शेतकऱ्यांनी त्याची काटेकोरपणे जुलै व ऑगस्ट महिन्या पर्यंत अंमलबजावणी केल्यामुळे शेंदरी बोंडअळी नियंत्रणात आली. परंतु ऑक्टोबर पासून पुढे कामगंध सापळे लावणे,प्रादुर्भावाची निरीक्षणे घेणे बंद झाली त्यामुळे शेतकरी या काळात गाफील राहिले. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या दरम्यान प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती येथील प्रक्षेत्रावर ४ ते २५.४४ पतंग प्रती दिवस प्रती सापळा एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसून आले. जे आर्थिक नुकसान पातळी पेक्षा दोन ते तीन पटीने जास्त आढळून आले. तसेच डिसेंबर अखेरीस नांदेड ४४ वाणावर ६० टक्के व अजित १५५ या वाणावर ७५ टक्के शेंदरी बोंड अळी चा प्रादुर्भाव आढळून आला. ही संपूर्ण विदर्भासाठी धोक्याची घंटा असल्याचे मत डॉ. ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी हंगामासाठी आतापासूनच जीन मालक आणि शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन डॉ. ठाकरे यांनी केले आहे. 

 

बोंडअळीचा उद्रेक टाळण्यासाठी उपाययोजना: जिनिंग परिसरात कापसाची आवक झाल्यापासून संपूर्ण जिनिंगचे काम संपेपर्यंत शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण करणे आवश्यक झाले आहे. यासाठी जानेवारी पासून जिनिंग परिसरात किमान एक प्रकाश सापळा व १५ ते २० कामगंध सापळे लावणे आवश्यक आहे. कामगंध सापळ्या मध्ये विशेषत्वाने पी.सी.आय.कंपनीचे ल्युर बसवल्यास जास्त पतंग आकर्षित होतात. दररोज किंवा आठवड्यातून दोनदा कामगंध सापळ्यामध्ये अडकलेले पतंग माहितगार व्यक्तीद्वारे जमा करून त्यांचा नाश करावा. दर तीन आठवड्याने नियमितपणे कामगंध सापळ्यातील ल्युर बदलणे आवश्यक आहे. मे-जून च्या दरम्यान जिनिंग परिसरात किडलेली सरकी,रुई किंवा खराब कापसाचे ढीग शक्य असल्यास जिनिंग परिसरातच फाटलेल्या बोंद्ऱ्यासह जाळून नष्ट करावीत. शहराबाहेर योग्य ठिकाणी नेवून जमिनीमध्ये गाढून किंवा जाळून नष्ट करावीत. म्हणजे त्यातील बोंडअळीची सुप्त अवस्था नाश होईल व पुढील हंगामात आजूबाजूच्या परिसरात पतंग निघणार नाहीत आणि त्यांचे जीवनचक्र पूर्णपणे खंडित होण्यास मदत होईल. 
जून- जुलै महिन्यामध्ये जिनिंग परिसरात निघालेली कपाशीची झाडे त्वरित मजुरांद्वारे किंवा ग्रामोक्झोन २४ टक्के एस.एल.(पाराक्वाट २४ टक्के) @ ३२ मिली प्रती १० लि.पाणी किंवा ग्लायफोसेट ४१ टक्के एस.एल. १०० मिली. प्रती १० लि.पाण्यात मिसळून या तणनाशकचा फवारा मारून कपाशीची नवीन झाडे, गाजर गवताचे निर्मुलन करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. 

 

हंगामानंतर व पेरणीपूर्व करावयाच्या उपाययोजना 

डिसेंबर नंतर फरदडी घेण्याचे कटाक्षाने टाळावे. कपाशीची शेवटची वेचणी झाल्याबरोबर शेतात गुरे ढोरे शेळ्या मेंढ्या प्रथम शेतात सोडाव्यात म्हणजे त्या झाडावरील किडकी बोंडे,पाने खावून टाकतील त्यामुळे किडींच्या सुप्तावस्था नष्ट होतील. उपटलेल्या पऱ्हाटीचा ढीग शेतात तसाच न ठेवता तो गावाजवळ आणून त्याचा कंपोष्टसाठी वापर करावा. जानेवारी अखेर पर्यंत किंवा जास्तीत जास्त फेब्रुवारी मध्यापर्यंत जमिनीची खोल नागरटी करावी म्हणजे किडींचे जमिनीतील कोष उन्हाने किंवा पक्षांचे भक्ष बनून नष्ट होतील. किडींचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी पिकांची फेर पालट करावी. कोणत्याही परिस्थितीत मान्सून पूर्व (एप्रिल-मे) कालावधीत कपाशी लागवड करू नये. 


नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे उपोषण 
प्रतिनिधी | नेरपिंगळाई 

मागील वर्षी जाहीर झालेल्या गुलाबी बोंड अळीच्या अनुदानापासून शिरलास सालेमपूर परिसरातील शेतकरी अजूनही वंचित आहेत. अनुदान मिळावे म्हणून परिसरातील वंचित शेतकऱ्यांनी बुधवारपासून (दि. ६) आमरण उपोषणाला सुरुवात केली. 
परिसरातील ८० टक्के कपाशी बोंड अळीने उद््ध्वस्त केली होती. शासनाच्या सर्वेक्षण यादीत शिरलस-सालेमपूर परिसराचे नाव असूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही.सूरज अवचार यांनी बोंड अळीच्या त्रासाला कंटाळून उभ्या कापाशीत रोटाव्हेटर फिरवून कपाशी नष्ट केली होती. या संदर्भात त्यांनी नुकसान भरपाईकरिता निवेदने दिली होती, परंतु अजूनपर्यंत त्यांना अनुदान नुकसानभरपाई मिळालीनाही. परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित मिळावी म्हणून मोर्शी तहसीलदार यांना सुरज अवचार, संजय सुने, सुधाकर बरडे, महादेव बरडे, पंकज गुजर व शेतकाऱ्यांनी निवेदनही दिले, परंतु निवेदनाची दखल शासनाने न घेतल्याने शेवटी बुधवारपासून परिसरातील शेतकरी सूरज अवचार, सुधाकर बरडे, संजय सुने, राजेंद्र लोचन, विष्णू कुऱ्हाडे यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...