आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश म्हणतो,काळा पैसा वाढला: अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले- मनमोहन सिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘लोकल सर्कल’ या संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात बहुतांशी लोकांनी काळ्या पैशाचे व्यवहार पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे नमूद केले आहे. यात ३९ टक्के लोकांनी दैनंदिन व्यवहारात ५० ते १०० टक्के व्यवहार विनापावत्याच झाल्याचे नमूद केले आहे. तर १८ टक्के लोकांनी हे प्रमाण २५ ते ५० टक्के राहिल्याचे नमूद केले आहे. ३७ टक्के लोकांनी हे प्रमाण ५ ते २५ टक्के दरम्यान राहिल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, संपत्तीच्या खरेदीतही ५० टक्के लोकांनी २५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान रोखीचे व्यवहार केल्याचे मान्य केले आहे

 

. तर ३८ टक्के लोकांनी हे व्यवहार पूर्णपणे धनादेश वा ई-पेमेंटच्या माध्यमातून केल्याचे सांगितले. १२ टक्के लोकांनी अशा व्यवहारांमध्ये २५ टक्के रोखीचे व्यवहार केल्याचे मान्य केलेय. दरम्यान, नोटबंदीमुळे करदात्यांमध्ये वाढ झाल्याचे ४० टक्के लोकांनी या सर्वेक्षणात नमूद केलेय. २३ टक्के लोकांनी कर संग्रहण वाढल्याचे नमूद केले तर २५ टक्के लोकांना कर संग्रहणात सरकारला कुठलाही लाभ झाला नसल्याचे वाटते. १२ टक्के लोकांनी काळा पैशाचे प्रमाण कमी झाल्याचे नमूद केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काळ्या पैशाचे चलन मोठ्या प्रमाणात वाढेल, असे मत ६० टक्के लोकांनी व्यक्त  केले.

 

असा केला सर्व्हे 
सर्व्हेक्षणात देशातील २१५ जिल्ह्यांमधील १५ हजारांवर लोकांची मते जाणून घेतली. त्यात महिलांचे ३० टक्के तर पुरुषांचे ७० टक्के प्रमाण राहिले. त्यापैकी चाळीस टक्के लोक महानगरे अथवा टीयर-१ शहरांमधील. ३१ टक्के टीयर- २ तर २९ टक्के टीयर-३ अथवा ग्रामीण भागातील होते.

 

फायदे-तोट्यावरून सरकार, विरोधी पक्षांमध्ये पुन्हा पेटले वाक््युद्ध

देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले : सिंग

नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडल्याची घणाघाती टीका माजी पंतप्रधान मनमोहनसिंह केली. ट्विटरवर ते म्हणाले, काळाच्या ओघात जखमा बऱ्या होतात. मात्र, नोटबंदीमुळे झालेल्या जखमा अद्यापही भळभळत असून त्या अधिक स्पष्टपणे दिसत अाहेत. नोटबंदीसारखे अनाठाई धाडस देशासाठी किती महाग पडू शकते, हे समजून घेण्याचा दिवस अाहे.

 

अर्थव्यवस्था पुनर्बांधणी शक्य झाली : जेटली

नोटबंदी हे अर्थव्यवस्था पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे पाऊल होते, या शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या निर्णयाचे समर्थन करीत आरोपांना प्रत्युत्तर दिले. देशातील काळ्या पैशाला आळा बसला. काळा पैसा बाळगणारांची माहिती सरकारला मिळाली. करचुकवेगिरीवर लगाम बसला आणि महत्त्वाचे म्हणजे करदात्यांचे प्रमाण वाढले.

 

सुटाबुटातल्या मित्रांचा काळा पैसा पांढरा व्हावा, हे कारस्थान : राहुल गांधी

नोटबंदी हे पंतप्रधानांच्या सुटाबुटातल्या मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीचे अत्यंत क्रूर असे कारस्थान होते, अशी टीका काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी सोशल मिडियावर थेट पंतप्रधानांवर निशाना साधला. नोटबंदीचा निर्णय हा साळसूदपणे घेतलेला नाही. तो पूर्ण विचाराअंती सुटाबुटातल्या मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीच घेण्यात आला, असे राहुल गांधी यांनी नमूद केले. तर नोटबंदीचा निर्णय ही मोदी सरकारची सर्वात मोठी घोडचूक होती, अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...