आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Crime Of The Four Accused, Including Mukul Roy Of BJP, In The Murder Case Of Trinamool MLA

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तृणमूल आमदाराच्या हत्या प्रकरणात भाजपच्या मुकुल रॉयसह चौघांवर गुन्हा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिस्वास यांच्या हत्येप्रकरणी भाजपचे नेते मुकुल रॉय यांच्यासह चार जणांवर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. 


या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आमदार बिस्वास यांच्या हत्येप्रकरणी आम्ही आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून, इतर तिघांना ताब्यात घेतले आहे. ज्या गावठी पिस्तुलाने बिस्वास यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या ते पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. आमच्या प्राथमिक तपासानुसार बिस्वास यांच्यावर पाठीमागून गोळ्या झाडण्यात आल्या. हत्येसाठी अत्यंत नियोजनबद्ध कट रचण्यात आला होता.
 
हल्लेखोर या भागातून पळून जाण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता या अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नादियाची सीमा बांगलादेशाच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे हल्लेखोर बांगलादेशात पळून जाण्याची शक्यता आहे. सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवण्याचा सतर्कतेचा इशारा पोलिसांना देण्यात आला आहे. 

 

गुन्हा दाखल करण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या प्रेरित : रॉय 
आमदार सत्यजित बिस्वास यांच्या हत्येवरून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गुन्हा दाखल झालेले मुकुल रॉय हे तृणमूलचे माजी खासदार होते. त्यांनी गेल्या वर्षीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पूर्णपणे 'राजकीय हेतूने' प्रेरित आहे, अशी टीका करून रॉय म्हणाले की, तृणमूलमधील अंतर्गत वादातूनच बिस्वास यांची हत्या झाली असावी. बिस्वास यांच्या हत्येमुळे मलाही दु:ख झाले आहे, पण त्यासाठी तृणमूलचे नेते ज्या पद्धतीने भाजपला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला घाणेरडा कट म्हणता येईल. 

 

फुलबाडी भागातील सरस्वती पूजनादरम्यान झाली हत्या 
किशनगंज मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेेले बिस्वास यांची शनिवारी सायंकाळी नादिया जिल्ह्यातील फुलबाडी भागातील सरस्वती पूजा समारंभात हत्या करण्यात आली होती. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णालयातून त्यांच्या घरी आणण्यात आला. त्या वेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. 

 

भाजपच जबाबदार 
मतुआ समुदायाचे असलेले बिस्वास यांच्या हत्येसाठी भाजपच पूर्णपणे जबाबदार आहे. मतुआ समुदायाला आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान गेल्या आठवड्यात ठाकूरमगरला आले होते. आता भाजप नेते राजकीय लाभ मिळवण्यासाठी गुन्हेगारी कारवाया करत आहेत. - फिरहाद हकीम, राज्याचे नगरविकासमंत्री 

 

हत्येसाठी भाजपच जबाबदार : तृणमूल काँग्रेसचा आरोप 
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांनी मात्र बिस्वास यांच्या हत्येसाठी भाजपलाच जबाबदार ठरवले. ते म्हणाले की, या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. बिस्वास यांच्या हत्येने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जोरदार धक्का बसला आहे. सत्यजित यांची हत्या करून आपल्याला फायदा होईल असे वाटणारे लोक मूर्खांच्या नंदनवनात राहत आहेत. 

 

सीबीआयद्वारे चौकशी करावी 
बिस्वास यांच्या हत्येत भाजपचा कुठलाही हात नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची गरज आहे. त्यातूनच सत्य बाहेर येईल. सत्ताधारी पक्षातील अंतर्गत वादातूनच बिस्वास यांचा बळी गेला असावा. आमदाराची हत्या होत असेल तर सामान्यांना सुरक्षित कसे वाटेल? - दिलीप घोष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष 

 

बातम्या आणखी आहेत...