आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार आजी-माजी आमदारांसह 614 जणांवर तडीपारीचे संकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, तसेच शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह तब्बल ६१४ जणांविरोधात पोलिसांनी तडीपारीचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यात अनेक विद्यमान नगरसेवकांचाही समावेश आहे. जिल्हा प्रशासनासमोर होणाऱ्या सुनावणीनंतर या सर्वांच्या तडीपारीचा निर्णय होणार आहे. तडीपारीच्या या संकटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


महापालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिसांनी तब्ब्ल ६१४ जणांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर केले आहेत. त्यात सर्व राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते, तीन विद्यमान व एका माजी आमदारासह आजी- माजी नगरसेवकांचा समावेश आहे. या सर्वांना प्रांत कार्यालयाने नोटिसा बजावल्या असून सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भिंगार कॅम्प पोलिसांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी या दोन्ही आमदारांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच आधारावर दोघांविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अन्य १३० जणांच्या विरुद्धही असाच प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह २४७ जणांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव सादर केले आहेत.


तोफखाना पोलिसांनी विद्यमान नगरसेवक कुमार वाकळे, स्वप्निल शिंदे, माजी नगरसेवक निखिल वारे, दिगंबर ढवण अशा २३७ जणांविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान, या सर्वांना प्रांत कार्यालयाने नोटिसा बजावून सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश िदले आहेत. आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक जणांची सुनावणी घेण्यात आली आहे.
उर्वरित सुनावणीची कार्यवाही सुरुच आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर तडीपार झालेल्यांची अंतिम नावे समोर येणार आहेत.


अनेकांना कारवाईचा धसका
केडगाव येथील दुहेरी हत्याकांड, पोलिसांवरील दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड या तिन्ही घटना ७ एप्रिल २०१८ रोजी एकापाठोपाठ घडल्या. मात्र, पोलिस प्रशासनाने या सर्वांवर गुन्हे दाखल करत अनेकांची धरपकड केली. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनाचा मोठा दबाव राजकीय गुंडांवर निर्माण झाला. त्यामुळे मोहरम व गणेशोत्सव शांततेत पार पडला. आता ९ डिसेंबरला होणारी महापालिका निवडणूकदेखील शांततेत पार पडावी, यासाठी आधीपासूनच सावध असलेल्या पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच ठेवली. महापालिकेच्या निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेत पोलिसांनी पुन्हा तडीपारीचे प्रस्ताव सादर केले. पोलिसांच्या या कारवाईचा अनेकांनी धसका घेतला आहे. सुनावणीनंतर तडीपारीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास संबंधितांना १० डिसेंबरपर्यंत जिल्ह्याबाहेर राहावे लागणार आहे.
सुनावणीची प्रक्रिया सुरू.


...तर जिल्ह्याबाहेर राहूनच रिंगणात
एकीकडे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे, तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने राजकीय व्यक्तिंविरोधात तडीपारीचे प्रस्ताव सादर केले आहेत. या कार्यवाहीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केडगाव हत्याकांड, पोलिसांवर झालेली दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या दगडफेक प्रकरणी सुमारे ९०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी अनेकांविरोधात आता तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे. प्रत्येकजण वकिलांचे उंबरठे झिजवत आहेत. तडीपारीची कार्यवाही झाली तर अनेकांना जिल्ह्याबाहेर राहूनच निवडणुकीला सामोरे जावे लागणर आहे.


तडीपारीच्या प्रस्तावातील प्रमुख नावे
आमदार शिवाजी कर्डिले, अरुण जगताप, संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, सुवेंद्र गांधी, सुभाष लोंढे, कुमार वाकळे, स्वप्निल शिंदे, दिगंबर ढवण, निखिल वारे, अभिषेक भोसले, श्रीपाद िछंदम, प्रशांत गायकवाड, विठ्ठल सातपुते, हर्षवर्धन कोतकर, गजेंद्र दांगट, विकी जगताप, धोप्या राजगुरू, सुरेश गायकवाड, नरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब बोराटे, आसाराम कावरे, अनिता दिघे, किशोर डागवाले, गणेश केराप्पा, सुनील कोतकर, गणेश भोसले, निखिल धंगेकर, घनश्याम बोडखे, मुदस्सर पठाण, ऋषिकेश कोतकर, बंटी राऊत, परशुराम खराडे सातपुते, मयूर बुचूघोळ

बातम्या आणखी आहेत...