आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाला जाब विचारावेतच, मात्र बाेलणाऱ्यांची मुस्कटदाबी; ज्येष्ठ अभिनेते अमाेल पालेकर यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येला तब्बल पाच वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही त्याचे मारेकरी, सूत्रधार सापडत नसल्याने सामान्य माणसाच्या मनात अस्वस्थता अाहे. एक मारेकरी याप्रकरणी सापडणे ही तपासाची सुरुवात असून मागील पाच वर्षांत केवळ दाेन अाराेपींना अटक हाेत असेल तर या गतीने पुढे किती काळ तपास चालणार हा प्रश्नच अाहे. शासनाविराेधात काेणी काही बाेलले तर संबंधित लाेकांच्या विचारांची मुस्कटदाबी हाेते. मात्र, लाेकशाहीत विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण असून तरुणांनी शासनाला काेणत्याही गाेष्टीचा जाब विचारलाच पाहिजे, असे मत अभिनेते अमाेल पालेकर यांनी साेमवारी व्यक्त केले. 


डाॅ. दाभाेलकर यांच्या हत्येस पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सूत्रधार न सापडल्याचे निषेधार्थ अंनिसतर्फे 'जवाब दाे' कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. त्यापूर्वी डाॅ. दाभाेलकर यांची हत्या झाली त्या महर्षी वि. रा. शिंदे पूल ते राष्ट्रसेवा दल यादरम्यान निषेध रॅली काढून डाॅ. दाभाेलकर, काॅ. पानसरे, साहित्यिक कलबुर्गी, गाैरी लंकेश यांचे मारेकरी अाणि सूत्रधार पकडले जावेत, अशी मागणी करण्यात अाली. या वेळी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, अभिनेत्री साेनाली कुलकर्णी, माजी अायपीएस अशाेक धिवरे, डाॅ. हमीद दाभाेलकर, मुक्ता दाभाेलकर, मेधा पानसरे आदी उपस्थित हाेते. पालेकर म्हणाले, डाॅ. दाभाेलकर खून प्रकरणाचा तपास हा काेणत्याही राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन याेग्य प्रकारे हाेणे महत्त्वाचे अाहे. एखादी विशिष्ट संस्था सातत्याने कशा प्रकारे हल्ले करू शकते, यापाठीमागे असणारी राजकीय इच्छाशक्ती, राजकीय विचारप्रणाली, राजकीय दडपण या दृष्टीने चिंतन केले पाहिजे. एखादी चळवळ सरकारविराेधात उभी राहिली तर तिला तिच्याकडे देशद्राेही म्हणून पाहिले जाते. कलावंत म्हणून माझे मत असे अाहे की, समाजातील प्रत्येक विचार सामान्य नागरिकांपर्यंत पाेहोचला पाहिजे, त्याला कुठेही मध्येच दडपले जाणे अयाेग्य अाहे. 


मुक्ता दाभाेलकर म्हणाल्या, डाॅ. दाभाेलकरांचे मारेकरी सापडावेत यासाठी पाच वर्षांपासून अाम्ही लढा देत अाहाेत. हा मार्ग खडतर असला तरी यापुढील काळात अाम्ही वाटचाल करतच राहणार. विवेकाच्या मार्गाने अामचा अावाज सदैव उठवत राहू, त्यामध्ये काेणत्याही हिंसेला थारा असणार नाही.' 


गांधी, भगतसिंग यांचे बलिदान व्यर्थ : तुषार गांधी 
भगतसिंगांच्या बलिदानानंतर त्यांच्याप्रमाणे तरुण पिढी तयार व्हावी अशी अपेक्षा हाेती, मात्र अाजच्या तरुणाईने गद्दारी केली. गांधींना मारणाऱ्या शक्तींनी अापणास पुन्हा गुलाम केले अाहे. त्यामुळे भगतसिंग व गांधींचे बलिदान व्यर्थ गेले अाहे. दाभाेलकरांचे मारेकरी ५ वर्षात का सापडले नाहीत? की या कटात सहभागी सर्व संस्था, लिंक मिटविण्याकरिता ५ वर्षाचा कालावधी वापरला का ही शंका तुषार गांधी यांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...