आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्कालीन हैदराबाद संस्थानकडून आई तुळजाभवानी मंदिरात सुरू केलेला रोजचा नैवेद्य पाऊण शतकानंतरही अविरत सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रसेन देशमुख  उस्मानाबाद - हैदराबाद संस्थानात एकीकडे निझामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध असंतोष होता, तरी दुसरीकडे परस्परांच्या धर्माचा, त्यातील विधी-परंपरांचा मात्र आदर राखला जात होता. तत्कालीन संस्थानचे दिवाण चंदूलाल यांच्याकडून तुळजाभवानी मातेला दररोज दोन वेळच्या नैवेद्याची व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत सन्मानपूर्वक आणि आदरभावाने सुरू केलेला नैवेद्य आजही म्हणजे सुमारे ७६ वर्षांनंतरही अखंडपणे सुरू आहे. तुळजापुरातील कुतवळ घराण्याला हा मान आहे. आई तुळजाभवानी मातेला निझाम सरकारच्या काळात १३४९ फसली म्हणजे १९४३ मध्ये निझामाचे दिवाण चंदूलाल यांच्याकडून दोनवेळच्या नैवेद्याची परंपरा सुरू झाली. वास्तविक, १९०९ मध्ये तुळजाभवानी मंदिर निझाम संस्थानच्या ताब्यात गेले.अर्थात या संस्थानचे अधिकारी मंदिराचा कारभार पाहू लागले. मात्र, या सरकारचे दिवाण चंदूलाल यांनी स्वतंत्रपणे देवीच्या दोनवेळच्या नैवेद्याची सोय करून दिली होती. देवीचे तत्कालिन पुजारी भीमराव कृष्णाजी कुतवळ यांच्याकडे हा मान देण्यात आला होता.   हैद्राबाद संस्थानने प्रतिनैवेद्यास तेवहा २५ रुपये देण्याची तरतूद केली असली तरी या कुटंुबाला केवळ महिना ५०० रुपये मानधन दिले जाते. वास्तविक, या नैवेद्यासाठी महिन्याला १० ते १२ हजार रुपये खर्च येतो, असे माधवराव कुतवळ यांनी सांगितले. वाढलेल्या महागाईनुसार मानधन द्यावे, यासाठी माधवराव कुतवळ यांच्यासह त्यांच्या पूर्वजांनी मंदिर संस्थानकडे वेळोवेळी प्रयत्न केले. मात्र, या माध्यमातून देवीची सेवा करण्याचा मान घराण्याकडे असल्याचा त्यांना अभिमान असून, त्यामुळेच अखंडपणे ही सेवा सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.      

निझामाच्या अधिकाऱ्यांना दिवाणाचे पत्र
या पत्रामध्ये म्हटले आहे की... ‘भीमराव कृष्णाजी कुतवळ यांचे जिथे नैवेद्याची व्यवस्था केली गेली आहे, ती कायमस्वरूपी आहे. तरतुदीमध्ये प्रति नैवेद्यास २५ रुपयांची याकरिता हिशेबाने जारी झाली आणि या कामाकरिता व देवळाचे कामाकरिता मोबदला आहे, ज्याबाबत त्यांनी वेळोवेळी पुरावा दिला आहे. याची प्रत भीमराव कृष्णाजी कुतवळ यांना माहितीस्तव दिली जाते.’
 
 

अजूनही मंदिर संस्थानकडून मानधन :
कुतवळ घराण्यातील आनंदराव व नंतर माधवराव कुतवळ यांच्याकडून ही सेवा अखंड सुरू आहे. हैदराबाद संस्थान बरखास्त झाले तरी ही परंपरा मनोभावे सुरू असून १९४८ नंतर मंिदर संस्थानकडून म्हणजे शासनाकडून या कुटंुबाला मानधन दिले जाते.
 
> सकाळी स्नानानंतर आणि सायंकाळी, अशा दोन्ही वेळी धूपारतीनंतर कुतवळ कुटुंबाकडून नैवेद्य पाठवला जातो.  सध्या अभिजित कुतवळ यांच्याकडे या सेवेचा मान आहे.
> दोन्ही वेळच्या नैवेद्यामध्ये तुळजाभवानी मातेला चपाती किंवा पुरणपोळी, २ स्वादिष्ट भाज्या, तुरीचे वरण, लोणकढं तुप, त्यानंतर स्वीट डिश म्हणून बत्ताशे किंवा खडीसाखर आणि पानाचा विडा दिला जातो.
 

बातम्या आणखी आहेत...