दिव्य मराठी विशेष / ‘द डाँकी किंग’ सर्वाधिक पाहिला गेलेला पाकिस्तानी चित्रपट; गाढव राजा झाल्याची कथा, इम्रान यांची खिल्ली उडवल्याचा आरोप

  • पाकमध्ये सलग ३० आठवडे चाललेला पहिला चित्रपट, जगातील १० भाषांमध्ये रूपांतर
  • या चित्रपटाने अनेक विक्रम स्थापन केले आहेत

वृत्तसंस्था

Feb 14,2020 09:55:00 AM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या राजकीय स्थितीवर तयार झालेला अॅनिमेशन विनोदी चित्रपट द डाँकी किंग जगात सर्वाधिक पाहिला गेलेला पाकिस्तानचा चित्रपट झाला आहे. तो जगातील दहा भाषांमध्ये डब झाला आहे. तो दक्षिण कोरियात प्रदर्शित पहिला पाकिस्तानी चित्रपटही आहे. तसेच, तो तुर्कस्तान, रशिया, स्पेनसहित सुमारे ७ देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. ताविज स्टुडिओ आणि जिओ फिल्म्स निर्मित आणि अजीज जिंदानी दिग्दर्शित या राजकीय व्यंग असलेल्या चित्रपटात एक गाढव मंगू नशिबाने राजा झाल्याची कथा दाखवण्यात आली आहे.


लोक पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी त्याचा संबंध जोडत आहेत. इम्रान आणि या चित्रपटातील अनेक व्हिडिओ एकत्र करत शेअर करण्यात आले. यामुळे त्यावर पंतप्रधान इम्रान खान यांची टिंगल उडवल्याचे आरोपही झालेत. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक अजीज जिंदानी यांनी ते नाकारले आहे. ते सांगतात की, त्यांना या चित्रपटाचा विचार २००३ मध्ये सुचला होता आणि २०१३ मध्ये त्यावर कामाला सुरुवात केली होती. ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रदर्शित हा चित्रपट पाकिस्तानात खूप लोकप्रिय ठरला आहे. त्यानंतर आता जगभरात तो पोहोचत आहे आणि जागतिक पातळीवर लोकप्रिय होत आहे. प्रदर्शनाआधी या चित्रपटाला कायदेशीर लढाईही लढावी लागली. त्यावर राजाच्या पदाचा अपमान केल्याचाही आरोप झाला. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मात्र तो फेटाळून लावला होता. चित्रपटाला राजकीय वादाचाही फायदा झाला.

अनेक विक्रम स्थापन केले आहेत या चित्रपटाने


द डाँकी किंगने अनेक विक्रम स्थापन केलेत. तो पाकिस्तानात पहिल्याच दिवशी सर्वाधिक ३६ लाख रुपये कमावणारा अॅनिमेशन चित्रपट आहे. दुसऱ्याच दिवशी त्याने एक कोटीचा आकडा पार केला होता. त्याने आतापर्यंत ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपट समीक्षकांनी त्याला पाकिस्तानातील नंबर एक ब्लॉकबस्टर चित्रपट म्हटले आहे.

X
COMMENT