आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक पक्षांपुढे अंधार (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुका घोषित होण्याअगोदर देशातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपला बहुमतापासून रोखण्याची किमया काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्ष करू शकतात, असे वाटत होते आणि तशी राजकीय समीकरणे त्या सुमारास सपा, बसप, लोकदल, तृणमूल, आरजेडी, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, तेलुगू देसम, अण्णाद्रमुक, द्रमुक या पक्षांकडून मांडण्यास सुरुवात झाली होती. यात सर्वांना धक्का देणारी उत्तर प्रदेशात सपा-बसप युती झाली. पूर्वाश्रमीचे कट्टर शत्रू मित्र झाले. या दोघांनी भाजपचा िहंदू राष्ट्रवाद रोखण्यासाठी जातींवर आधारित सामाजिक न्याय उभा केला. पण या न्यायात विकास-प्रगती, रोजगार, उद्योगधंदे असा कार्यक्रम नव्हता. उलट त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे हिंदू धर्मातल्या जाती व्यवस्थेला जवळ केले गेले, त्यांच्या जातीय अस्मितांना चेतवले गेले, दलित, मुस्लिम, ओबीसीतर जातींना एका छत्राखाली आणण्यासाठी जातनिहाय उमेदवार उभे केले गेले. पण या रणनीतीत व्यापक देशहिताचा मुद्दा नसल्याचे लक्षात घेऊन भाजपने सफाईने स्वत:च्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादाला राष्ट्रवादाची जोड देत विकासाचा कार्यक्रम ठेवला. मोदींनी उत्तर प्रदेशातल्या प्रचारात तिथल्या इतर मागास जातींपुढे आपले ओबीसी असणे सातत्याने बिंबवले. याचा परिणाम असा झाला की, २०१४च्या लोकसभा निवडणुका व नंतरच्या २०१७च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती झाली. या दोन निवडणुकांत भाजपच्या सकल हिंदुत्ववादाने व नोटबंदीने जातींचे समीकरण सहजपणे गिळंकृत केले. हा इतिहास सपा-बसप विसरल्या. ते त्यांचे परंपरागत राजकारण करत बसले आणि त्यांना जबर फटका बसला.


इकडे प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला शह देण्यासाठी भाजपने बंगालमध्ये सामाजिक सौहार्दावरच हल्ला केला. आजपर्यंत प. बंगालमध्ये धार्मिक आधारावर राजकारण खेळले गेले नव्हते. मोदींनी ही पोकळी भरत सामान्य बंगाली मतदारावर आपली कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा ठसवली. आसाममध्ये बांगलादेशींना हुसकावून काढण्याचे जे प्रयत्न भाजपने केले तसे प्रयत्न बंगालमध्ये केले जातील, अशी हवा त्यांनी उभी केली. ममतांचा भाजपविरोध हा मुस्लिमांचे अनुनय, असाही एक प्रचार भाजपकडून होऊ लागला. त्याचा परिणाम खोलवर झाला. अमित शहांनी तर ‘जय श्रीराम म्हणण्यास मला अटकाव करा’, असे ममतांना आव्हान दिले. हा मुद्दा बंगालमध्ये आला हे अतर्क्य वाटत असले तरी यातून त्यांनी बंगालचा ४० टक्के मतदार आपल्याकडे ओढून घेतला आणि १७ उमेदवार जिंकून आणले. मोदी-शहा जोडगोळीने प्रादेशिक पक्षांचे राजकारण देशाच्या प्रगतीआड कसे येते याचे अनेक दाखले प्रादेशिक पक्ष जेथे मजबूत आहेत तेथे जाऊन दिले. या दोघांनी प्रादेशिक पक्षांची ‘महामिलावट आघाडी’ म्हणून संभावना केल्याने तर मतदार आपसूकच भाजपकडे आकर्षित झाला. एकूणात २०१९ची लोकसभा निवडणूक यापुढे प्रादेशिक पक्षांसाठी एक धडा म्हणून राहणार आहे. कारण या निवडणुकांतून दोन-एक राज्ये वगळता भाजपने जवळपास सर्वच राज्यांत आपला स्वत:चा मोठ्या टक्केवारीचा मतदार तयार केला आहे. तो मतदार प्रादेशिक पक्षांचे भवितव्य ठरवेल, अशीच शक्यता आहे.