Accident / शिवसेना उपशहरप्रमुखाचा मृतदेह आढळला, घातपात करून अपघाताचा बनाव केल्याचा कुटुंबीयांचा संशय

सफाई कामगारांना दुचाकीसह दुचाकीस्वार पुलाखालीच पडलेला आढळला

दिव्य मराठी

Jun 23,2019 11:12:00 AM IST

सिल्लोड - शिवसेना सिल्लोड उपशहरप्रमुख सचिन शांतीलाल अग्रवाल यांचा शुक्रवारी रात्री उशिरा अपघाती मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. शुक्रवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास ते वळण रस्त्यावरील एका हाॅटेलातून बाहेर पडल्याचे त्यांना शेवटचे पाहिले. शनिवारी महिला सफाई कामगारांना पुलाखाली मृतदेह आढळून आला.


शिवसेना उपशहरप्रमुख सचिन शांतीलाल अग्रवाल यांचा मृतदेह शनिवारी सकाळी दुचाकीसह पुलाखाली पडलेला आढळल्याने त्यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे घात की अपघात या चर्चेने जोर धरला आहे.


सिल्लोड शहरातील म्हसोबा गल्लीत राहणारे सचिन अग्रवाल कट्टर शिवसैनिक होते. त्यांचे शहरातील भराडी नाक्यावर चहा, फराळाचे हाॅटेल आहे. राजकारणात त्यांचा सहभाग नावापुरताच असून निवडणूक काळात शहरात ते राहत असलेल्या भागापुरते त्यांचे कार्यक्षेत्रात असल्याने राजकीय वैमनस्य असण्याचीही शक्यता नाही. शुक्रवारी रात्री म्हसोबा गल्लीत दोस्त मित्रांशी गप्पागोष्टी करून ते एकटेच दुचाकीवरून बाहेर पडले. रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वळण रस्त्यावरील एका हाॅटेलातून बाहेर पडले. शनिवारी सकाळी नगर परिषदेच्या महिला सफाई कामगारांना दुचाकीसह दुचाकीस्वार पुलाखालीच पडलेला आढळला. जवळच असलेले किराणा दुकानदार सुभाष दरी यांना घटना सांगितली. त्यांनी सचिन यांना ओळखले घरी जाऊन सचिन अग्रवाल यांच्या आईकडे सचिन यांची चौकशी केली असता रात्री ते घरीच आले नाही असे समजले. तेव्हा दरी यांनी सचिन यांचे मोठे भाऊ किशोर यांना घटना सांगितली.


प्रथमदर्शनी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे दिसते. परंतु कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुठी बंद होत्या. फक्त डोक्याला मार आहे. मोबाइलची फक्त बॅटरीच खिशात होती. सर्वात महत्त्वाचा संशय म्हणजे दुचाकीचा समोरचा भाग हेडलाईट गायब आहे. त्याचे अवशेषही सापडले नाहीत. यावरून घातपात करून अपघाताचा बनाव केला असण्याचा कुटुंबीयांचा संशय आहे. याप्रकरणी शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, माजी नगरसेवक सुदर्शन अग्रवाल व सचिन यांचे मोठे बंधू किशोर यांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्याकडे संशय व्यक्त केला आहे.

X