आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांना फाशी देण्याचे प्रमाण 1 टक्क्यापेक्षा कमी; राज्यात 6 फाशींना स्थगिती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महेश जोशी 

औरंगाबाद : निर्भया प्रकरणातील ४ आरोपींची फाशी तिसऱ्यांदा टळली. त्यामुळे फाशी की जन्मठेप हा मुद्दा चर्चेला आला आहे. सुप्रीम कोर्ट व केंद्रीय विधी आयोगाने दुर्मिळातील दुर्मिळ वगळता अन्य प्रकरणात फाशीऐवजी जन्मठेपेची शिफारस केली आहे. यामुळे  देशात गेल्या दोन दशकांत मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या २४९४ पैकी केवळ चौघेच फासावर लटकले. २०१८ मध्ये फाशीची शिक्षा झालेल्या १८६ पैकी ६५ जणांची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आली. महाराष्ट्रात सहा फाशींना स्थगिती मिळाली आहे.     

भारतात बलात्कार, हत्या, दहशतवाद अशा प्रकरणांत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाते. १९८२ मधील बच्चन सिंग विरुद्ध पंजाब सरकार या खटल्याच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणातच फाशीची शिक्षा ठोठावली जावी, असे सांगितले आहे. केंद्रीय विधी आयोगाने २०१५ मध्ये दहशतवाद आणि देशाविरोधातील युद्ध वगळता अन्य प्रकरणांतील मृत्युदंडाला स्थगिती देण्याची शिफारस केली होती. केंद्राने २०१९ मध्ये पॉस्को कायद्यात सुधारणा करत अल्पवयीनांवरील बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडाची तरतूद केली आहे. 

६५ फाशींचे जन्मठेपेत रूपांतर

आयपीसीच्या कलम ५४ आणि सीआरपीसीच्या कलम ४३२,४३३ आणि ४३३ तील तरतुदीनुसार मृत्युदंडाला स्थगिती देत ती जन्मठेपेत रूपांतरित करता येते. याशिवाय राज्यपाल व राष्ट्रपतींकडे दयेच्या अर्जाद्वारे शिक्षा शिथिल करता येते. २०१८ मध्ये या पद्धतीने १८६ पैकी ६५ प्रकरणांत फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आली. महाराष्ट्रात २० पैकी सहा जणांची फाशी जन्मठेपेत बदलण्यात आली. 

२०१८ मध्ये १८६ मृत्युदंड

एनसीआरबी व द प्रिझन स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये देशात १८६ जणांना मृत्युदंड सुनावण्यात आला. महाराष्ट्र, झारखंडात प्रत्येकी २०, उत्तर प्रदेश २५, तर मध्य प्रदेशात २६ शिक्षा ठोठावल्या. मृत्युदंडापैकी ४९ टक्के शिक्षा या ४ राज्यांत सुनावल्या. आंध्र, तेलंगण, सिक्कीम, नागालँड, मेघालय, मिझोराम, अरुणाचल, जम्मू-काश्मीर आणि गोवा या ९ राज्यांत एकही फाशीची शिक्षा झालेली नाही.

गेल्या २ दशकांत २,४९४ जणांना मृत्युदंड, प्रत्यक्षात ४ जण फासावर 

देशात वर्षाकाठी सरासरी १३१ जणांना फाशी सुनावली जाते. २००७ व २०१८ मध्ये हे प्रमाण १८६ वर गेले. २०१४ मध्ये ९५ जणांना फाशीची शिक्षा झाली. २००० सालापासून देशभरात २४९४ जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रत्यक्षात केवळ ४ जणांनाच फासावर लटकवण्यात आले. २००४ मध्ये धनंजय चक्रवर्ती, २०१२ मध्ये अजमल आमेर कसाब, २०१३ मध्ये अफजल गुरू, तर २०१५ मध्ये याकूब मेमन याला फासावर लटकवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...