आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीतून कर्जाची वसुली नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गुरुवारी लातूर जिल्ह्यात पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी राज्यपालांनी जाहीर केलेल्या अर्थिक मदतीमधून कोणत्याही कर्जाची वसुली केली जाणार नाही, असे आश्वासन दिले.  त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही या नेत्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी काढण्यात येणाऱ्या या मोर्चात शिवसेनेचे राज्य पातळीवरील नेते सामील होणार असल्याचे सांगण्यात आले.  लातूर जिल्ह्यात दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टी झाली होती. त्यात काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये धावती भेट देत पाहणी केली होती. आता महिनाभरानंतर शिवसेनेने माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लातूर जिल्ह्यात पाहणीसाठी पाठवले. या दोघांनी गुरुवारी लातूर तालुक्यातील पेठ, बोरी, औसा तालुक्यातील हासाळा, हासेगाव, हासेगाव तांडा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथील नुकसानीची पाहणी केली.   यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, शहर जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, पप्पू कुलकर्णी, सतीश शिंदे, विष्णू साबदे, जयश्री उटगे, दिलीप सोनकांबळे, श्रीमंत समुद्रे, बालाजी रेड्डी, गोपाळ माने, वीरभद्र गादगे, विश्वनाथ स्वामी उपस्थित होते.   प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी दररोज बैठकांवर बैठका सुरू आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांऐवजी केवळ सत्तास्थापनेतच रस आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, अशी प्रतिमा निर्माण होऊ नये यासाठी शिवसेना नेते महिनाभरानंतरही नुकसानीची पाहणी करीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.महिनाभरानंतर पाहणी का?

अतिवृष्टीला महिना उलटून गेला. मधल्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही येऊन गेले. मग महिन्यानंतर चंद्रकांत खैरे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या नुकसान पाहणी दौऱ्यामागचे प्रयोजन काय असा प्रश्न शेतकऱ्यांनाच नाही तर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनाही पडला होता.  नुकसान झालेले सोयाबीन शेतकऱ्यांनी  जाळून टाकले. आता  रब्बी पेरणी करण्याची तयारी सुरू आहे. काहींनी तर पेरण्या उरकल्या आहेत. महिनाभरानंतर शिवसेना नेते नुकसान पाहणी दौऱ्यावर का आले याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे
.