आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर व पुणे जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार गोयकर याची निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत नगर व पुणे जिल्ह्यातील कुविख्यात गुन्हेगार राहुल गोयकर याची कर्जत तालुक्यातील खंडाळा या त्याच्या गावी बुधवारी रात्री लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृण हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी तीन महिला व पाच पुरूष अशा आठ जणांना अटक केली. भाऊसाहेब बबन खांडेकर, बबन किसन खांडेकर, हौसराव भानुदास गोयकर, संतोष होसराव गोयकर, तोळाबाई बबन खांडेकर, ताई संतोष हुलगे, उज्ज्वला भाऊसाहेब खांडेकर (मूळ गाव खंडाळा, हल्ली गुलटेकडी, पुणे) व राजेंद्र चौधरी (पठारवाडी, कर्जत) यांचा समावेश आहे.


नगर व पुणे जिल्ह्यात राहुल गोयकरवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याची टोळी होती. अनेक गुन्ह्यांमध्ये तो विविध पोलिस ठाण्यांना वाॅँटेड होता. मागील महिन्यात राजगुरूनगर येथून कोठडीचे गज कापून राहुल व विशाल तांदळे पळून गेले होते.
खंडाळा हे राहुल गोयकर याचे गाव. जेलमधून पळाल्यावर तो खंडाळा गावात वेषांतर करून रहात होता. कर्जतमध्येही अनेकावेळा तो येत असे. दिवाळीसाठी बाहेरगावी राहणारे अनेक जण गावी आले होते. गावातील एकाचे लग्न नुकतेच झाल्यामुळे २० ला त्याची वरात काढण्यात आली. या वरातीत थोडा वाद होऊन मारामारी झाली होती.


बुधवारी रात्री १० वाजता भाऊसाहेब खांडेकर व त्याचे नातेवाईक घरात असताना तेथे राहुल गोयकर आला. वरातीमध्ये माझ्या मित्राला का मारले, असे म्हणून त्याने भाऊसाहेब खांडेकर याच्या स्कॉर्पिओ गाडीच्या काचा फोडण्यास सुरूवात केली. त्याचा राग येऊन भाऊसाहेब खांडेकर, बबन किसन खांडेकर, हौसराव भानुदास गोयकर, संतोष होसराव गोयकर, तोळाबाई बबन खांडेकर, ताई संतोष हुलगे, उज्ज्वला भाऊसाहेब खांडेकर व राजेंद्र चौधरी यांनी राहुलला खाली पाडले आणि लाकडी दांडक्याने डोके, गळा आणि गुप्तांगावर जबर मारहाण केली. त्याचे डोके ठेचून त्याला ठार करण्यात आले. नंतर भाऊसाहेबने कर्जत पोलिस ठाण्यात येऊन मी राहुल गोयकरचा खून केला असे सांगितले. ज्या खांडेकर कुटुंबाने राहुलचा खून केला, त्यांचा अडीच वर्षांपूर्वी राहुलच्या वडिलांशी पुण्यात वाद झाला होता. त्यावेळी कोणताही गुन्हा नोंदवला गेला नव्हता.


राहुल गोयकर गावातील गोरगरिबांना कारण नसताना त्रास देत होता. त्यामुळे सर्व गाव त्रासले होते. राहुलचे वडील खंडाळ्यात रहात होते. त्यांच्या नावावर असलेली शेतजमीन विकण्यासाठी तो येथे आला होता. शेतीला कोणी ग्राहक मिळते का, हे तो शोधत होता. जमीन विकून आलेले पैसे घेऊन कायमस्वरूपी गाव सोडण्याचा त्याचा विचार होता. मात्र, त्याचा शेवट गावातच झाला.


देशातील अनेक बँकांना फसवून विदेशात पळून गेलेल्या निरव मोदी याने याच खंडाळा गावात येथील भूमिपुत्रांच्या शेतजमिनी कमी पैसे देऊन विकत घेतल्या आहेत.
मृत राहुल गोयकर खंडाळा गावात जिथे हत्या झाली घडली तो परिसर.


हत्या करताना पेट्रोल बाॅम्बचाही झाला वापर...
राहुल गोयकर हा कुविख्यात गुन्हेगार होता. त्याला मारण्याचा कट नियोजित असावा. कारण त्याला मारताना बाटल्या फेकण्यात आल्या. त्यांचा स्फोट होत होता. यातील काही बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असल्याने दोन्ही कुटुंबांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. निरीक्षक राजेंद्र चव्हाण पुढील तपास करत आहेत

बातम्या आणखी आहेत...