आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटोलेंना पाडणे मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचे, पालकमंत्र्यांना दिली भाजपची उमेदवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेखर मगर 

साकोली ( जि. भंडारा) - भाजपकडून २०१४ मध्ये खासदार झालेले नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातच शड्डू ठोकले होते. त्यामुळे त्यांना लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही पराभूत करण्याची व्यूहरचना मुख्यमंत्र्यांनी आखली आहे. साकोलीतून भाजपचे आमदार बाळा काशीवार यांचा पत्ता कट करून मुख्यमंत्र्यांनी मित्रवर्य परिणय फुके यांना रिंगणात उतरवले. मोदी यांची राज्यातील पहिली प्रचारसभाही साकोलीतच घेतली.
तावडे, खडसे, मेहता, बावनकुळे आदींचे पत्ते मुख्यमंत्र्यांनी कट केले. त्यानंतर विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांनाही अटकाव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यूहरचना आखली आहे. अजित पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदींच्या पराभवासाठी भाजपच्या उमेदवारांवर विशेष लक्ष दिले जात आहे. विशेषत: नागपूरात नितीन गडकरींकडून पराभूत पटोले आता त्यांच्या पूर्वीच्या साकोली मतदारसंघातून काँग्रेसतर्फे लढत आहेत. २०१४ मध्ये येथून भाजपचे बाळा काशीवार विजयी झाले होते. आता काशीवार मागे सारून फडणवीसांनी भंडाराचे पालकमंत्री म्हणून काम केलेल्या फुके यांना रिंगणात उतरवले आहे. फुके नागपूरचे असून विधान परिषद सदस्य आहेत. तरीही त्यांना पटोलेंच्या विरोधात लढवून त्यांच्या मागे मोठी ताकद उभी केली जात आहे.  
 

मैत्रीमुळे दगा-फटका होऊ नये म्हणून...
बाळा काशीवार आणि नाना पटोले यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. त्यांच्यातील मधूर संबंधामुळे दगा फटका होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपलेच विश्वासू फुके यांना संधी दिली असे बोलले जात आहे. २००४-२००९ दरम्यान काँग्रेसतर्फे आमदार झालेले सेवक वाघाये येथून वंचित बहुजन आघाडीतर्फे नशिब आजमवत आहेत. भाजपचे ब्रह्मानंद करंजेकर यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. पण स्वत: मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन करून अर्ज मागे घ्यायला लावला. 
 

पटोलेंनी केले दोन वेळा प्रतिनिधित्व      
भंडारा जिल्ह्यात २००४ मध्ये पवनी, साकोली, भंडारा, तुमसर आणि लाखांदूर असे मतदारसंघ होते. पुर्नरचनेत २००९ मध्ये साकोली व लाखांदूर मतदारसंघ एकत्र केले गेले. २००४ मध्ये पटोले लाखांदूरमधून आमदार झाले. साकोलीत वाघाये आमदार होते. पुर्नरचनेनंतर वाघाये यांचा पराभव करून नानांनी साकोलीतून विजय मिळवला होता. २००९ मध्येच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष असूनही पटोलेंनी प्रफुल्ल पटेल यांना जेरीस आणले होते. 

मुख्यमंत्र्यांनी भंडाऱ्यात तिन्ही उमेदवार बदलले
तुमसरमधून चरण वाघमारे, भंडारामधून रामचंद्र अवसरे आणि साकोलीतून बाळा काशीवर आमदार होते. पण मुख्यमंत्र्यांनी या तिघांना ‘ब्रेक’ देऊन वाघमारे एेवजी प्रदीप पडोळे, अवसरे यांच्या एेवजी जि.प. सदस्य डाॅ. अरविंद भालाधरे यांना संधी दिली आहे. साकोलीतून फुकेंना रिंगणात उतरवले आहे. डाॅ. भालाधरे यांच्या विरोधात रिपाइं नेते प्रा. जोगेद्र कवाडे यांचे चिरंजीव जयदीप कवाडे काँग्रेसचे उमेदवार आहेत. वाघमारंेनी तुमसरमधून बंडखोरी केली आहे. त्यांना पटोलेंनी साथ दिल्याची चर्चा आहे.