आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत भक्तांना ७७७० केशर आमरसाची पंगत, शिरूरच्या दीपक करगळांनी दान केले आंबे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात शिरूर येथील दानशूर साईभक्त दीपक नारायण करगळ यांच्या देणगीतून भाविकांना केशर आंब्याचे आमरस प्रसाद भोजन देण्यात आले. या भाविकाने तब्बल ७ हजार ७७० केशर आंबा दान केल्याने सुमारे ५० हजारांहून अधिक भाविकांनी आमरस मेजवानीचा लाभ घेतला.


सध्या आंब्याचा सीझन चालू असून पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील साईभक्त दीपक नारायण करगळ यांनी साई प्रसादालयात भाविकांना केशर आंब्याचा आमरस देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी साई संस्थानला ७ हजार ७७० केशर आंबा दान केला. साईचरणी दानरूपी आलेल्या या आंब्याचा भाविकाच्या इच्छेनुसार प्रसादालयात भोजनासाठी येणाऱ्या भाविकांना आमरस करून प्रसाद भोजनासोबत देण्यात आला.  साईभक्त दीपक करगळ यांच्याकडून आलेल्या आंब्याचा रस तयार करून भाविकांना दररोजच्या जेवणात नियमितपणे दोन भाज्या, डाळ, भात, चपाती आणि रस देण्यात आला. दिवसभरात सुमारे ५० ते ६० हजार भाविक या आमरसाचा लाभ घेतल्याचे प्रसादालय प्रमुख विष्णुपंत थोरात यांनी सांगितले. 


साईबाबा संस्थानने भव्य प्रसादालय उभारले आहे. किमान ४० हजारांहून अधिक भाविक या ठिकाणी भोजनाचा लाभ घेतात. आशिया खंडात सर्वात मोठे मेगा किचन म्हणून या प्रसादालयाची ख्याती आहे. प्रसादालयातील भोजन सौरऊर्जेवर बनवले जात असून इंधन बचत होते. विविध राज्यांतील दानशूर भाविक अन्नदान फंडात देणगी देतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार भोजन मिळण्यासाठी साईबाबा संस्थान नेहमी प्रयत्नशील असते.

 

भाविकांसाठी मोफत प्रसाद : श्रीराम नवमी, गुरुपौर्णिमा, साईबाबा पुण्यतिथी या उत्सवात भाविकांना मिष्टान्न जेवण देण्यात येते. आषाढी एकादशी व महाशिवरात्रीला भाविकांना खिचडी व शेंगदाण्याचे झिरके देण्यात येते. उत्सव किंवा सुट्टीच्या दरम्यान प्रसादालयात भोजन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत असली तरी भाविकांची गैरसोय संस्थान प्रशासनाने होऊ दिलेली नाही. येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत प्रसाद भोजन साईसमाधी शताब्दी वर्षापासून देण्यात येत आहे.