आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस-उद्धव यांच्यातील चर्चेने “सत्तेची’ कोंडी फुटणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत शिंदे 

मुंबई - लोकसभेला युती करताना ठरलेल्या सूत्राप्रमाणेच सत्तावाटप झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने सत्तास्थापनेची झालेली कोंडी आता भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर सुटण्याची शक्यता आहे. याबाबत फडणवीस व उद्धव यांनी चर्चा करावी, असा सल्ला शहा यांनी दिला असून त्यानुसार हे दोन्ही नेते चर्चा करणार आहेत. या वृत्ताला शिवसेना व भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला. ही चर्चा झाल्यानंतर शहा मुंबईत येऊन यावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

लोकसभेच्या वेळी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेचे समान वाटप केले जाईल, असे वक्तव्य स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. सत्तेचे समान वाटप म्हणजेच मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचे ठरले असल्याचे सांगितले जात होते. मात्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी याचा इन्कार केला होता. त्यावरून शिवसेनेत प्रचंड नाराजी होती. ही नाराजी अमित शहा यांच्या कानावर गेल्यावर शहा यांनी महायुती सत्तेत यावी यासाठी चर्चा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एक-दोन दिवसांत दोन्ही नेत्यांची चर्चा होईल. 
 

लवकरच शपथविधी होईल... :
चर्चा आम्ही थांबवलेली नाही. त्यांनीच थांबवली आहे. निवडणुकीत आम्ही महायुती म्हणूनच जनतेसमोर गेलो होतो. आता शिवसेनेसोबतच नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल, असे भाजप नेते माधव भंडारी यांनी सांगितले.

राऊतांच्या दाव्याचे काय?
राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा न देण्याचे ठरवल्याने स्वबळावर मुख्यमंत्री बनवण्याचा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा दावा फोल ठरत चालला असल्याचे दिसत आहे. शिवसेनेतील सूत्रांनुसार, उद्धव ठाकरे सत्तावाटपाबाबत सकारात्मक असून चर्चेतून मार्ग निघेल आणि शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन होईल.

शिवसेनेची सोबत हवीच...
गेल्या वेळी भाजपाने सत्ता स्थापन केल्यानंतर काही दिवसांनी शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. यावेळी भाजपने एकट्याने सत्ता स्थापन करण्याऐवजी शिवसेनेसोबतच सत्तेवर यावे, असे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे म्हणणे आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही महायुतीचा शपथविधी होईल, असे स्पष्ट केले आहे.ही खाती
 

कळीचे मुद्दे

ृह, अर्थ, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास ही खाती अत्यंत महत्वपूर्ण असून यापैकी काही खाती मिळावीत, अशी  शिवसेनेची इच्छा आहे. मात्र गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडेच ठेवणार आहेत. याचे राज्यमंत्रिपद शिवसेनेला दिले जाईल. वित्त खात्याचेही राज्यमंत्रिपद शिवसेनेला दिले जाणार असून नगरविकासचे राज्यमं़पदही दिले जाऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभाग शिवसेनेला देऊन त्याचे राज्यमंत्रिपद  भाजपकडे ठेवले जाऊ शकेल.
 

पवार घेणार सोनियांची भेट
शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची महत्वाकांक्षा लक्षात घेऊन शिवसेनेला सत्तेसाठी पाठिंबा देण्याचा विचार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असून त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी किंवा सोमवारी नवी दिल्ली येथे सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होऊ शकते, अशी माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली. सोनिया गांधी मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नाहीत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. 

भाजपला निमंत्रित करण्याची घटक पक्षांची मागणी 
सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे, अशी मागणी महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रासपचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे संदीप पाटील आणि रिपाईंच्या अन्य नेत्यांनी राज्यपालांची या मागणीसाठी भेट घेतली.