आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा याेग्य दिशेने : उद्धव; ठाकरे परिवारातील व्यक्ती सीएम नकाे : काँग्रेसची अट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘काँग्रेसच्या नेत्यांबरोबर योग्य दिशेने चर्चा सुरू असून जो काही निर्णय होईल, तो योग्य वेळी सर्वांना कळेलच,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांसाेबतच्या बैठकीनंतर दिली. शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावर दाेन्ही काँग्रेस व शिवसेनेत एकमत असले तरी किमान समान कार्यक्रमात त्यासह इतर विषयांवर एकमत हाेणे बाकी आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार असलाे तरी ठाकरे कुटुंबीयांतील कुणालाही मुख्यमंत्रिपद दिले जाऊ नये, अशी अट काँग्रेसने घातल्याचे समजते. त्यातच साेनिया गांधींचे निकटवर्तीय काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी उद्धव ठाकरे यांना ‘आठ दिवस थांबा’ असा सल्लाही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेेनेच्या संभाव्य आघाडीत अजूनही एकमत हाेताना दिसत नाही. 

शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे यांची बीकेसी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही प्राथमिक चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र बसून एक किमान समान कार्यक्रम तयार करतील आणि त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ. तुम्ही किमान आठ दिवस थांबा, मात्र याचा अर्थ आपण एकत्र येत नाही असे नाही, असा विश्वासही पटेल यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बुधवारी सकाळी काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली व चर्चा केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांची बीकेसी येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये जवळजवळ तासभर चर्चा केली. या वेळी सुभाष देसाई, विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. या चर्चेदरम्यान काँग्रेसने आपल्या आठ ते दहा अटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले जाते. तसेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही चर्चा झाली. 

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम तयार व्हायला हवा, असा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने ११ मंत्रिपदांसह विधानसभा अध्यक्षपदाचीही मागणी केल्याचे समजते. उद्धव ठाकरे सकारात्मक भेट झाल्याचे सांगत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मात्र, ‘ही केवळ सदिच्छा भेट होती’ असे सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असून आधी राष्ट्रवादीसोबत आम्ही चर्चा करू. नंतर गरज भासल्यास शिवसेनेशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘पहिल्यांदा किमान समान कार्यक्रमाबाबत आमच्या पक्षात चर्चा करू. त्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा करू. त्यानंतर सत्तावाटप सूत्र आणि शिवसेनेला पाठिंबा याबाबत चर्चा होईल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा घेऊन त्यातील कोणते मुद्दे घ्यायचे आणि कोणते मुद्दे वगळायचे हे ठरवले जाईल. त्यानंतर किमान समान कार्यक्रम तयार करताना वादग्रस्त मुद्द्यांचे काय करायचे हेही ठरवले जाईल. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय सत्तावाटपाच्या सूत्रात केला जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
काँग्रेसच्या प्रमुख अटी
> किमान समान कार्यक्रम अाधी ठरवा
> तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची समन्वय समिती
> सत्तावाटपाचा निश्चित फॉर्म्युला
> महापालिकेचाही फॉर्म्युला निश्चित करावा.
> शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संयुक्त सरकार बनवत असल्याची घोषणा करावी.
> राज्यपालांना द्यायची पत्रे गुरुवारपर्यंत गोळा करावीत.
> ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणीही मुख्यमंत्रिपदी नकाे.