Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | The distance between two villages is one and a half kilometers

दोन गावांत अंतर दीड किलोमीटर, पण राज्ये मात्र वेगवेगळी; एका राज्यात घरोघरी मुबलक पाणी, दुसरीकडे मात्र तहानेची कहाणी

दीपक पटवे | Update - May 17, 2019, 08:18 AM IST

इच्छाशक्ती असली अन् स्वार्थ आडवा आला नाही तर घडू शकतो बदल...

 • The distance between two villages is one and a half kilometers

  साक्री (धुळे) - समस्येचे निराकरण करण्याची इच्छाशक्ती असली आणि त्यात स्वार्थ आडवा आला नाही तर काय बदल घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर पाहायला मिळते. दोन राज्यांतल्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन गावांतील दुष्काळाच्या चित्रात त्यामुळे जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. गुजरातमधील गावात प्रत्येकाच्या दाराशी पाण्याच्या टाक्या भरलेल्या आहेत, तर महाराष्ट्रातल्या गावात ठिकठिकाणी पाण्यासाठी बसवलेल्या टाक्यांमध्ये दीड वर्षात अजून थेंबभरही पाणी पडलेले नाही.

  गुजरात : छतावरच्या पाण्यानेच भरतात टाक्या

  घुसरगाव हे गुजरात राज्यातले महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेले गाववजा पाडा. ओटा ग्रुप ग्रामपंचायतीत ते येते. चरणमाळपासून हे अंतर साधारण दीड किलोमीटरचे. चरणमाळच्याच शेवटच्या पाड्यापासून तर एक किलोमीटरही नसेल. इथे प्रत्येक घराच्या भिंतीला लागून पाण्याच्या भल्या मोठ्या टाक्या बनवलेल्या आहेत. सिमेंट काँक्रीटच्या या टाक्या साधारण ८ ते १० फूट खाेल आहेत. १२ हजार लिटर क्षमता असलेल्या या टाक्या काँक्रीटनेच बंद केलेल्या आहेत. त्यावर मॅनहोलवजा झाकण आहे. ते काढले की टाकी साफ करण्यासाठी माणूस आत उतरू शकतो. पाणी किती शिल्लक आहे तेही पाहाता येते. याच टाकीवर एक छोटा हातपंप बसवलेला आहे. लहान मुलगाही त्या पंपाचे हॅण्डल हालवून पाणी काढू शकतो इतका ताे साॅफ्ट असतो. त्यातून लगेच पाण्याची धार सुरू होते. प्रत्येक घरासमोरच्या टाक्यांमध्ये भरपूर पाणी असलेले आम्ही पाहिले. या टाक्यांमंध्ये छतावरचे पाणी संकलीत होऊन पडेल, अशी व्यवस्था केलेली अाहे. डोंगर दऱ्यांचा हा भाग म्हणजे पश्चिम घाटाची सुरूवात आहे. त्यामुळे तिथे भरपूर पाऊस पडतो. अगदी चार, पाच महिने तिथे साधारण रोज पावसाची रिमझिम तरी सुरूच असते, असे तिथले ग्रामस्थ सांगतात. हे सर्व पाणी कौलारू छतावरून संकलीत होऊन या टाकीत पडते. त्याआधी ते गाळले जाईल, अशी जाळी टाकीच्या तोंडाशी बांधलेली असते. पावसाळ्यात या टाक्या पूर्ण भरतात. ओव्हरफ्लो झाली की पाणी बाहेर सोडलेले असते. ग्रामपंचायतीने केलेल्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी थांबले की हे ग्रामस्थ टाक्यांमधील पाण्याचा वापर करतात. त्यातून त्यांचा उन्हाळा सुसह्य होतो. लागलेच ते शेवटी शेवटी काही जण पाण्याचा टँकर बोलावून या टाकीत रिकामा करून घेतात. ६०० रुपयांना त्यांना टँकरभर पाणी मिळते. त्याच आकाराचे टँकर चरणमाळला मागवले की त्याला १२०० रुपये द्यावे लागतात. गुजराथ सरकारने दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींसाठी आठ वर्षांपूर्वी ही योजना राबवली. आजही टाक्या धडधाकट आहेत.

  महाराष्ट्र : सार्वजनिक टाक्या उरल्या शोभेसाठी

  चरणमाळची परिस्थिती या उलट आहे. पाच पाडे मिळून इथली ग्रामपंचायत चालते. सरपंच राऊत हे पिंपळनेरला राहतात. कधी तरी येतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामसेवकही बाहेरगावीच राहतात, असे कळले. ग्रामसेवकाशी संपर्क होऊ शकला नाही. सरपंचाशी झाला. त्यांना गावात यायची विनंती केली. येतो म्हणाले, पण आलेच नाहीत. नंतर त्यांचा फोनही स्वीच आॅफ झाला. मग ग्रामस्थांनीच माहिती दिली. त्यानुसार गावात भीषण पाणीटंचाई आहे. गावची एक विहीर कोरडी पडली आहे. दुसरी विहीर खोदलेली आहे, पण बांधलेली नाही. त्यामुळे त्यातून पाणी काढता येत नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी दाराशी कूपनलिका करून घेतल्या आहेत. काहींनी छोट्या विहीरी खोदल्या आहेत. त्यांना पाणी राहिलेले नाही. २००३ मध्ये शेजारच्या धरणातून पाणीपुरवठा योजना केली गेली. ती वर्षभरच चालली. त्यानंतर गावच्या टाकीत पाणी आलेले नाही. कारण ज्यांच्या शेतातून जलवाहिनी आली आहे त्यातल्या अनेकांनी ती शेतात फोडून घेतली आहे. ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्यावर पर्याय करण्याऐवजी मागच्या वर्षी गावात जागोजागी पाण्याच्या प्लास्टीक टाक्या बसवून त्यांना नळ बसविण्यात आले. पण त्या टाक्या बसवल्या तेव्हापासून त्यात एक थेंबही पाणी आलेले नाही. चरणमाळ पासून दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या धरणातल्या विहीरीतून रात्री हे ग्रामस्थ पाणी आणतात. ते शक्यच झाले नाही आणि टँकर मागवायची वेळ आली तर एक टँकर १२०० रुपयांना मिळतो. दीड किलोमीटर अंतरावरच्या गावात ६०० रुपयांना मिळतो. इथे दुप्पट दर का, असे विचारले तेव्हा तिथे महाराष्ट्रापेक्षा डिझेलचे दर कमी आहेत, असे सांगण्यात आले. ग्रामपंचायत इमारतीच्या फरशा काढून नव्याने बसवणे, अंगणवाडीच्या फरशा काढून नव्याने बसविणे अशी कामे गावात जोरात सुरू आहेत. त्यावर खर्चही होतो आहे. पण ग्रामपंचायतीतर्फे टँकरद्वारे पुरेसे पाणी पुरवले जात नाही, असे ग्रामस्थ सांगतात. शेजारच्या गावाप्रमाणे पावसाच्या पाण्याने भरणाऱ्या मोठ्या टाक्या करून द्याव्यात, यासाठीही ग्रामपंचायतीला विनंती केली होती, पण ते कामही ग्रामपंचायतीने केले नाही, असे उत्तम साकळे यांनी सांगितले.

Trending