आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये येण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला मज्जाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांकरिता जागा उपलब्ध करण्याबाबत पाहणी करण्याचे काम निवडणूक प्रशासनाकडून सुरू आहे. स्टेशन रोडवरील ऑयकॉन पब्लिक स्कूलमध्ये मतदान केंद्रासाठी जागा उपलब्ध होऊ शकते का, याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्यांची अडवणूक करण्यात आली. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला. याप्रकरणी उपायुक्त प्रदीप पठारे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


येत्या ९ डिसेंबरला मनपाची सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यासाठी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील काही मतदान केंद्रांबाबत अडचणी आहेत, तर काही ठिकाणी नव्याने मतदान केंद्रे देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

या अडचणींमुळे जवळपासच्या शाळांमध्ये जागा उपलब्ध होईल का, याची तपासणी महापालिका व निवडणूक प्रशासनाकडून सुरु आहे. बुधवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपायुक्त प्रदीप पठारे, शहर अभियंता विलास सोनटक्के, उपअभियंता कल्याण बल्लाळ यांनी स्टेशन रोडवरील मनपाच्या शाळेची पाहणी केली. त्यानंतर जवळच असलेल्या मल्हार चौकातील ऑयकॉन पब्लिक स्कूलमध्ये मतदान केंद्र प्रस्तावित करता येईल का, किंवा तेथे जागा उपलब्ध होईल का, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व त्यांचे पथक तेथे गेले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांची तेथे अडवणूक करण्यात आली. ऑयकॉनच्या संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला तुम्ही शाळेच्या आवारात विनापरवाना प्रवेश कसा काय केला, असा सवाल उपस्थित केला. तसेच अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याने खडाजंगीही झाली. संचालकांनी अधिकाऱ्यांना शाळेच्या खोल्या पाहण्यास मज्जाव केला. त्यामुळे जिल्हाधिकारी व मनपाचे अधिकारी तेथून निघून आले.


याबाबत उपायुक्त प्रदीप पठारे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्र करता येईल का, याची पाहणी करण्यासाठी मनपाचे अधिकारी ऑयकॉन पब्लिक स्कूलमध्ये गेले असता, तेथील संचालक राणा (पूर्ण नाव माहित नाही) यांनी खोल्यांची पाहणी करण्यास मज्जाव केल्याचे व सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात अदखलपात्र (भारतीय दंड संहिता १८६) सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास कोतवाली पोलिस करत आहेत.


सरकारी पथकाला मज्जाव करणे हा अदखलपात्र गुन्हा
निवडणूक मतदान केंद्र प्रस्तावित करता येईल का, याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला हरकत घेण्यात अाली. हा सरकारी कामात अडथळा आणल्याचाच प्रकार आहे. मात्र, धक्काबुक्की किंवा शिवीगाळ दमदाटी झालेली नसल्याने कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८६ नुसार गुन्हा अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला ३ महिने कैद किंवा ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याची शिक्षा होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...