आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षांपासून कोमात असलेल्या डॉक्टर मुलीस स्ट्रेचरवर आणून घडवले साईदर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी -  वैद्यकीय उपचारानेही काहीच फरक पडत नसल्याने एका  दांपत्याने त्यांच्या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुलीला स्ट्रेचरवरून थेट साईदरबारात आणून दर्शन घडवले. त्या वेळी मंदिरात उपस्थित असलेल्या हजारो साईभक्तांनी या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी साईबाबांचरणी प्रार्थना केली. स्ट्रेचरवरून थेट साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा हा संस्थानच्या इतिहासातील कदाचित पहिलाच प्रसंग असल्याची सर्वत्र चर्चा आहे.    


वर्धा शहरात राहणारे बाबाराव मुंगल यांना दोन मुली आहेत. ते एसटी महामंडळात लेखा विभागातून लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले. मोठी मुलगी  शीतलने बालरोगतज्ज्ञ म्हणून एमडीपर्यंत शिक्षण घेतले आणि मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात बालरोग विभागात आयसीयू इन्चार्ज म्हणून रुजू झाली. दरम्यान, तिने लग्नही केले. सर्व काही आनंदात असतानाच ७ वर्षांपूर्वी रुग्णालयाची पायरी उतरत असताना पाय घसरला आणि शीतल खाली पडून कोमात गेली. तिच्या आईवडिलांनी मागील ७ वर्षांत तिला देशातील अनेक नामांकित रुग्णालयांत उपचारासाठी नेले. मात्र, पदरी निराशाच आली.  अखेर त्यांनी तिला घरीच ठेवत सेवा सुरू केली. बाबाराव यांचे मित्र आणि साई सेवक म्हणून काम केलेले मुंबई येथील भाटिया यांनी या  कुटुंबीयांना साईदरबारी येण्याची विनंती केली. त्यानुसार मुंगल कुटुंबीय थेट वर्ध्याहून रुग्णवाहिका घेऊन साईदरबारी पोहोचले. कोमात असणाऱ्या शीतलला स्ट्रेचरवरून बुधवारी साई मंदिरात आणण्यात आले. या ठिकाणी साई समाधीसमोर शीतलला नेत आपली मुलगी बरी व्हावी, यासाठी साईबाबांना साकडे घातले.  


बाबा नक्कीच तिला बरे करतील   
शीतलच्या आई आणि वडिलांनी सांगितले की, साईबाबांचे आशीर्वाद आमच्या कुटुंबावर असल्याने शीतलच्या प्रकृतीत बाबा नक्कीच सुधारणा करतील, असा आत्मविश्वास आहे.  मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांनीही या वेळी शीतलसाठी प्रार्थना केली.

बातम्या आणखी आहेत...