Death / कुत्र्याचे पिल्लू आणल्यामुळे आईने दटावले; अकरावर्षीय मुलाने रागातच घेतला गळफास 

मुकुंदवाडीतील प्रकाशनगर येथील हृदयद्रावक घटना 

दिव्य मराठी

Aug 11,2019 10:26:06 AM IST

औरंगाबाद : कुत्र्याचे पिल्लू पाळण्याचा हट्ट करणाऱ्या मुलाने शाळेतून घरी जाताच गल्लीतून पिल्लू उचलले. पिल्लासोबत खेळताना पाहून आईने दटावल्यामुळे रागाच्या भरातच अकरावर्षीय सर्वेश रणजितकुमार साह या शाळकरी मुलाने गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी प्रकाशनगरात घडली. रागावून आतल्या खोलीत स्वत:ला कोंडून घेतलेला आपला छकुला बराच वेळ होऊनही दरवाजा का उघडत नाही हे पाहून आईच्या काळजात धस्स झाले. तिने शेजाऱ्यांना आवाज दिला. त्यांनी छतावरील पत्रे सरकवून पाहताच मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. शनिवारी दुपारी तीन वाजता हा प्रकार समोर आला.

सेंट झेवियर्स शाळेत सातवी वर्गात शिकणाऱ्या सर्वेशला मागील अनेक दिवसांपासून कुत्र्याचे पिल्लू पाळायचे होते. त्यासाठी त्याने हट्टही धरला होता. परंतु आई-वडिलांनी समजूत घातली. मागील आठ दिवसांपासून तो गल्लीतील एका पिल्लासोबत खेळायला लागला होता. अधूनमधून तो त्याला घरी आणायचा. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पिल्लू घरात घाण करेल तेव्हा नंतर नक्की कुत्रे घेऊन देतो, असे आश्वासन आई-वडिलांनी त्याला दिले होते. परंतु त्याने मात्र बालहट्ट सोडला नाही.

शनिवारी दुपारी सर्वेश शाळेतून घरी गेला. या वेळी त्याचा धाकटा भाऊ व थोरली बहीण शाळेत गेले होते. शाळेतून घरी जाताच तो पुन्हा त्या पिल्लासोबत खेळायला लागला. शाळेतून घरी आल्या-आल्या कुत्र्यासोबत खेळायला लागल्याने आईने त्याला खेळू नको, असे सांगत दटावले. याचा राग आल्याने सर्वेशने आतील खोलीत स्वत:ला कोंडून घेतले. काही वेळाने आईने त्याला बाहेर येण्यास सांगितले. परंतु खूप वेळ आवाज देऊनही सर्वेश प्रतिसाद देत नसल्याने घाबरलेल्या आईने शेजारच्यांना बोलावून आणले. परिसरातील काही लोकांनी घराच्या छतावरील पत्रा बाजूला करून पाहिला असता सर्वेशने गळफास घेतल्याचे समोर आले. त्याला तत्काळ जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत सर्वेशचा मृत्यू झालेला होता. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

पिल्लाला सोबत आत घेऊन गेला
सर्वेश बऱ्याचदा नाराज झाला तेव्हा खोलीत जाऊन बराच वेळ बसायचा. त्यामुळे आत जाऊन तो पिल्लासोबत खेळत असेल, असाच आईचा समज झाला. त्यामुळे आईने काही मिनिटे त्याला आवाज दिला नाही. परंतु शनिवारी मात्र सर्वेशने गळफास घेतल्याचे पाहून त्या मातेचे हृदय पिळवटून निघाले.
तीस वर्षांपूर्वी शहरात स्थायिक झाले : मूळ बिहारचे असलेले साह कुटुंब तीस वर्षांपासून शहरात स्थायिक झाले आहे. सर्वेशचे वडील चिकलठाणा एमआयडीसीतील सामाजिक संस्थेमध्ये काम करतात, तर त्याची आई गृहिणी आहे. सर्वेश अभ्यासक्रमात हुशार व चपळ होता.

वडिलांनी आणलेला समोसा, चॉकलेट राहिले तसेच
सर्वेश वडिलांचा जास्त लाडका होता. शनिवारी रागात त्याने खोलीत स्वत:ला बंद करून घेतले. त्यानंतर तो दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या आईने रणजितकुमार यांना कॉल केला. तेव्हा हातातील काम सोडून रणजितकुमार तत्काळ घरी जाण्यासाठी निघाले. मैं घर पर जा रहा हूं, सर्वेश थोडा गुस्सा हुआ है, मैं जब तक जाऊंगा नहीं, तब तक मानेगा नहीं, थोडे समोसे और चॉकलेट लेकर जाता हूं, तब जाके मानेगा, असे सहकाऱ्यांना सांगत ते निघाले. परंतु मध्येच त्यांना रुग्णालयात बोलावले. मात्र ते पोहोचण्यापूर्वीच सर्वेशचा मृत्यू झाला होता.

X