आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसोल-नांदेड पॅसेंजरचे चार वर्षांत 159 वेळा इंजिन बिघडले; प्रवाशांना मनस्ताप 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- सिकंदराबाद विभागाने मराठवाड्यासाठी २०१६ पूर्वी आलेले नवीन उच्च शक्तीची इंजिने दिली नसल्याने मराठवाड्यात चालणाऱ्या ६ गाड्यांना जुनाट डिझेल इंजिन वापरले जात आहे. प्रवाशांची वाढती क्षमता लक्षात घेता लाेकोट इंजिन हे कालबाह्य झाले आहे. यामुळेच नगरसोलकडून नांदेडकडे येणाऱ्या नगरसोल पॅसेंजरचे इंजिन रविवारी नगरसोल येथेच पहाटे पहाटे बंद पडले. या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड होण्याची मागील चार वर्षांतील ही १५९ वी घटना ठरली. 

 

मराठवाड्याच्या रेल्वेच्या धमनीला महत्वाच्या १४ गाड्यांचाच आधार ठरत आहे. या गाड्यांसाठी डब्ल्यूडीजी ४ हे ७ हजार ८०० बीएचपीची १४ इंजिने देण्याचा निर्णय दमरेकडून झाला होता. यातील २०१६-१७ या वर्षात नांदेडचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक ए.के.सिन्हा यांच्या प्रयत्नातून ९ इंजिन मराठवाड्यात आणण्यात यश आले. त्यानंतर मराठवाड्याच्या नावे आलेली ५ इंजिने आजही सिकंदराबाद विभागातील विजयवाडा, सिकंदराबाद, हैदराबाद, गोलकडा या ठिकाणी वापरली जात आहेत. या इंजिनच्या जागी नागपूर- मुंबई नंदीग्राम, नांदेड -मनमाड पॅसेंजर, काचीगुडा-मनमाड पॅसेंजर, धर्माबाद-मनमाड पॅसेंजर, मनमाड -सिकंदराबाद अजंठा एक्स्प्रेस आणि नांदेड दौड या पॅसेंजर गाड्यांना लोकोट ४,८०० बीएचपी क्षमतेचे इंजिन वापरण्यात येत आहे. यातील दोन एक्स्प्रेस गाड्यांना प्रत्येकी दोन असे लोकोट इंजिन वापरले जातात. क्षमतेपेक्षा जास्त लोड झाल्यास ह्या गांड्यांचे इंजिन कोणत्याही ठिकाणी बंद पडत आहेत. 

 

रविवारी नेमके काय घडले : 
नगरसोलकडून नांदेडकडे येणाऱ्या नगरसोल पॅसेंजरचे इंजिन रविवारी नगरसोल येथेच पहाटे पहाटे बंद पडले. यामुळे या पॅसेंजरला न तीन तास उशीर झाला. ही गाडी औरंगाबादेत साडेदहा तर जालना स्थानकावर १२ वाजता दाखल झाली. यामुळे सुटी अन् गर्दीच्या दिवशी प्रवाशांना तासभर वाट पाहून इतर गाड्यांचा आधार घ्यावा लागला. या गाडीला जुनाट इंजिन दिल्यामुळेच हा प्रकार घडला. पॅसेंजर (क्रमांक ५७५४१) नगरसोल येथून सकाळी साडेपाच वाजता निघते, तर औरंगाबाद रेल्वेस्थानकावर सात ते साडेसात दरम्यान पोहोचते. रविवारी ही गाडी पहाटे नगरसोल येथून निघाली मात्र, काही वेळेतच इंजिनमध्ये बिघाड झाला. 

 

इंजिन मिळवण्यात गेले दोन तास : 
गाडीला इतर ठिकाणाहून इंजिन जोडण्यासाठी जवळपास दोन तासांचा वेळ लागला. ही गाडी औरंगाबादला १०.२५ तर पुढे जालना स्थानकावर १२ वाजता पोहोचली. रविवारी मोठी गर्दी होती. औरंगाबाद ते जालना तसेच जालना ते परतूर तसेच परभणी, नांदेड या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तासभर वाट पाहावी लागली. या दरम्यान मनमाडकडून आलेल्या काचीगुडा-मनमाड ह्या गाडीचा प्रवाशांना आधार झाला. मात्र, इतर गाड्या वेळेनुसारच धावल्या. 

 

सातत्याने जुने इंजिन : 
दमरेकडून नांदेड विभागासाठी सातत्याने जुनेच इंजिन दिले जातात. त्यामुळे रेल्वे खोळंबण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. सिकंदराबादच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आलेले नसल्याचे जालना रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

का मिळत नाही नवीन इंजिन 
नांदेड विभाग हा सिकंदराबाद दमरेअंतर्गत येतो. नांदेड विभागाला दिलेल्या १४ उच्च शक्ती इंजिन पैकी ५ इंजिन मुख्य विभागाकडेच आहेत. हे ५ इंजिन हे नांदेडकडे सोपवावेत यासाठी विभागीय व्यवस्थापक किंवा विभागीय अभियंते वरिष्ठांबरेाबर वाद नको म्हणून इंजिन मागत नाहीत. ही समस्या मराठवाड्यातील खासदारांकडून सोडवता येऊ शकते. नुकतीच खासदारांची वार्षिक बैठक नांदेड येथे घेण्यात आली होती. मात्र, या वेळी अनेक खासदारांनी या बैठकीलाच दांडी मारली. 
 

बातम्या आणखी आहेत...