आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौधरी, मराठा समाजाच्या एकगठ्ठा मतदानावर विजयाचे समीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे -  शहरातील प्रभाग क्रमांक ११मध्ये चुरशीची लढत होईल. प्रभागात माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उमेदवार महेश मिस्तरी, स्थायी समितीचे माजी सदस्य तथा भाजपचे उमेदवार प्रदीप कर्पे रिंगणात आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांचे चिरंजीव प्रीतम करनकाळ प्रथमच निवडणूक लढवत आहेत. प्रभागात तिरंगी लढत होईल. चौधरी व मराठा समाजातील मतदारांचे एकगठ्ठा मतदान कुणाला मिळते यावर विजयाचे समीकरण अवलंबून असेल. 

 

शहराच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक अकरा महत्त्वाचा प्रभाग आहे. हा प्रभाग माजी महापौर जयश्री अहिरराव यांचा आहे. मात्र त्या निवडणूक रिंगणाबाहेर असून, हद्दवाढीनंतर या प्रभागात बाळापूर गावाचा समावेश झाला आहे. प्रभागातील अ जागेवर भारतीय जनता पक्षातर्फे संजय रामदास पाटील उमेदवारी करीत आहे. ते बाळापूर येथील रहिवासी असून, त्यांना राजकीय वारसा आहे. त्यामुळे बाळापूरसह इतरही परिसरात त्यांचे वर्चस्व आहे. त्याचबराेबर काँग्रेसने प्रीतम करनकाळ यांना उमेदवारी दिली आहे. ते काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांचे चिरंजीव आहेत. युवराज करनकाळ यांचा या प्रभागात चांगला संपर्क असल्याने त्याचा फायदा प्रीतम करनकाळ यांना होऊ शकतो. त्याचबरोबर शिवसेनेचे पंकज किसन भारस्कर यांच्यासह अपक्ष व रासपचे उमेदवारही रिंगणात आहेत. प्रभागातील ब जागेवर शिवसेनेच्या उमेदवार सविता सुधाकर भडागे, काँग्रेसतर्फे नजमा शफी शाह व भाजपतर्फे लक्ष्मी दिनेश बागुल रिंगणात आहेत. शिवसेनेच्या उमेदवार सविता भडागे यांचा परिसरात प्रभाव असून, भाजपच्या लक्ष्मी बागुल यांचे पती दिनेश बागुल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.

 

प्रभागातील क जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कामिनी पाटील उमेदवारी करीत आहेत. शिवसेनेतर्फे मनीषा योगेश चौधरी, भाजपच्या वंदना विक्रम थोरात रिंगणात आहेत. वंदना थोरात यांनी यापूर्वी दोन वेळा निवडणूक लढवली आहे. मात्र, त्या पराभूत झाल्या होत्या. प्रभागातील ड जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रजनीश निंबाळकर उमेदवारी करीत अाहेत. त्यांनी यापूर्वीही निवडणूक लढवली आहे. भाजपतर्फे प्रदीप कर्पे रिंगणात असून, ते महापालिका स्थायी समितीचे माजी सदस्य होते. अनेक वर्षांपासून ते या परिसरात कार्यप्रवण असल्याने त्यांचा या भागात चांगला संपर्क आहे. ते यापूर्वी शिवसेनेत होते. शिवसेनेतर्फे महेश मिस्तरी उमेदवारी करत असून, ते यापूर्वी नगराध्यक्ष, नगरसेवक होते. शिवसेनेच्या विविध आंदोलनात ते अग्रेसर असतात. त्यामुळे प्रभागात ते सर्वत्र परिचित आहेत. त्याचबरोबर लाेकसंग्रामतर्फे सुमीत पवार रिंगणात असून ते बाळापूर ग्रामपंचायतीवर निवडून आले होते.

 

प्रभागात १७ हजार ७०० मतदार असून, त्यात हिंदू-मुस्लिम समाजातील मतदारांचा समावेश आहे. चौधरी व मराठा समाजाचे एकगठ्ठा मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहे. या भागात यापूर्वी दंगल झाली होती. त्यामुळे हा प्रभाग संवेदनशील समजला जातो. 

 

प्रभागातील स्थिती 
उद्यानासह जलकुंभ... 

प्रभाग क्रमांक अकराचा विस्तार मोठा आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत या प्रभागात जलकुंभ बांधण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अमृत योजनेतून उद्याने साकारण्यात आली आहेत. मोकळ्या जागेवर लहान मुलांसाठी खेळणी लावण्यात आली असून, काही ठिकाणी मोकळ्या जागांना संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. उद्यानात बालकांसाठी विविध अत्याधुिनक खेळणी बसवण्यात आली आहेत. 

 

पाणीपुरवठा अनियमित... 
प्रभागात बऱ्याच ठिकाणी रस्ते झालेले नाही. अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर अनेक भागात नियमित पाणीपुरवठा होत नाही. या भागातील नाल्यांची स्वच्छता नियमित होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे परिसरातील अनेक भागातील पथदिवे नादुरुस्त असल्याने नागरिकांची गैरसोय होते. नाल्याला संरक्षण भिंत बांधली तरी स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते - प्रदीप कर्पे 

बातम्या आणखी आहेत...