आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Farmer Became Angry At God, Food Abandonment From Three Days In Front Of Hanuman Temple For Rain

शेतकरी देवावर रुसला; पावसासाठी हनुमान मंदिरासमोर तीन दिवसांपासून अन्नत्याग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - सलग तीन वर्षांच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचं कंबरडं माेडलं, धीर खचून दिवसागणिक होणाऱ्या आत्महत्यांमुळे उघड्यावर पडणारे शेतकऱ्यांचे कुटुंब, पांढरं कपाळ अन् काळी माती घेऊन जगणाऱ्या बायाबापुड्या, चाऱ्याअभावी माळरानावर मरणासन्न अवस्थेत भटकणारी जनावरं आणि हंडाभर पाण्यासाठी काेसो दूर भटकणारे गावकरी... जिल्ह्यातील प्रत्येक गावाची ही स्थिती कुण्याही पाषाणहृदयाला पाझर फोडेल. पण या स्थितीही देवाला पाझर फुटला नाही. त्यामुळे पावसासाठी साकडे घालत शेपवाडी (ता. अंबाजोगाई) येथील उत्तम भानुदास शेप (वय ६५) या शेतकऱ्याने गावातच हनुमान मंदिरासमोर शनिवारपासून अन्न त्याग करून ठाण मांडले आहे.

दुष्काळाने हतबल शेतकऱ्यांना आता पावसाची अास असताना खरीप हंगाम हातचा गेला तरी पाऊस पडला नाही. दिवसेंदिवस बिकट होणाऱ्या परिस्थितीत जिल्ह्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांची कुटुंब उघड्यावर पडत आहेत. पाणी, चारा या समस्या आहेत. शेवटची आशा म्हणून देवावर विश्वास असलेल्यांनी त्याचाही धावा केला. परंतु, पाऊस पडत नसल्याने हनुमान भक्त असलेल्या उत्तम शेप यांनी शनिवारी सकाळपासून गावातीलच हनुमान मंदिरात अन्न त्याग करून पावसासाठी ठाण मांडले आहे. उत्तम यांच्या या भूमिकेमुळे गावकरीही अवाक झाले असून कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दोन दिवसांपासून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पाऊस पडला तरच अन्नसेवन करणार, अन्यथा अन्न त्याग अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
 
घरातही चूल बंद 
उत्तमराव यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या घरातही चिंतेचे वातावरण असून दोन दिवसांपासून त्यांच्या घरीही चूल पेटलेली नाही. कुटुंबीयही घरी उपाशी असून ते चिंतेत आहेत, असे त्यांचा मुलगा नरसिंग शेप याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
 
कोण आहेत उत्तम शेप 
शेपवाडी येथील रहिवासी उत्तम शेप यांची हनुमानावर भक्ती आहे. त्यांना दहा एकर कोरडवाहू जमीन असून तीन वर्षांच्या दुष्काळाने काहीही पिकलेले नाही. दोन मुलींचे लग्न झाले असून एक मुलगा आहे. संवेदनशील मनाच्या उत्तमराव यांना तालुका, जिल्ह्याच्या परिस्थितीचा कळवळा आल्याने त्यांनी अन्न त्याग करून हनुमानाकडे पावसासाठी धावा सुरू केला आहे.