गावभरातील भिंतींवर गणित रंगवून मुलाने केली वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण

दिव्य मराठी

Apr 22,2019 10:43:00 AM IST

नागपूर - कोणत्याही गावातील भिंती एरवी उमेदवारांच्या प्रचारांनी नाही, तर वेगवेगळ्या जाहिरातींनी रंगलेल्या असतात. यापैकी काहीच नसले तर पानाच्या पिचकाऱ्यांनी िवद्रूपीकरण झालेले असते. पण चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरी या गावातील ३० भिंती आज पहिली ते दहावीच्या गणिताच्या सूत्रांनी रंगलेल्या आहेत. जाता-येता आणि खेळता-खेळता मुले सहज गणिताची सूत्रे पाठ करतात.


हा चमत्कार घडवून आणला अक्षय वाकुडकर या युवकाने. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षेची तयारी करीत असलेल्या अक्षयला मृत्युशय्येवरील वडिलांनी दिलेला शब्द पूर्ण करायचा होता. त्यातून “मिशन मॅथेमॅटिक’ उपक्रम सुरू झाल्याची माहिती अक्षयने “िदव्य मराठी’शी बोलताना दिली. अक्षय एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे वडील हरिदास वाकुडकर यांची गावात शेती आहे. उत्पन्न जेमतेमच. मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून दोन्ही मुलांना त्यांनी पोटाला चिमटा देऊन शहरात शिकवले. अक्षयने नागपुरात इलेक्ट्राॅनिक इंजिनिअरिंग केले. दरम्यान, वडील आजारी पडले. उपचार सुरू असताना एक दिवस अक्षयला जवळ बोलावून सांगितले, गावात शिक्षणासाठी काहीतरी कर. त्यानंतर ते गेले. वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी काय करावे याचा विचार करत असताना मुलांना गणित हा विषय सर्वाधिक भेडसावत असल्याचे लक्षात आले. मुलांची गणिताची भीती घालवण्यासाठी गावातील घरांच्या भिंतीच गणिताच्या सूत्रांनी रंगवायचे ठरवले, असे अक्षयने सांगितले.

मृत्युशय्येवर असताना वडिलांनी मुलाला सांगितले, ‘गावात शिक्षणासाठी काहीतरी कर’

> २० जणांचा चमू करतो काम
अक्षय वाकुडकरसोबत त्याचे २० मित्र त्याच्याइतकीच मेहनत घेत आहेत. या उपक्रमाचे श्रेय मित्रांना
असून प्रत्येकाने कामे विभागून घेतली आहेत. यापुढे हा उपक्रम राज्यभर नेण्याचा मानस अक्षयने बोलून दाखवला. यासाठी दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था-संघटनांनी आर्थिक मदतीचे आवाहनही त्याने केल आहेे. भोसरीत पहिली ते पाचवी जिल्हा परिषदेची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी मुले गावापासून २ किमीवरील नांदगाव येथे शिकायला जातात. सुमारे ६०० घरे असलेल्या भोसरीची लोकसंख्या १,८८९ इतकी आहे.

> ५ दिवसांत रंगवल्या ३० घरांच्या भिंती
१० मार्चला उपक्रमाला सुरुवात केली. सहकाऱ्यांच्या मदतीने रात्रीचा दिवस करून ५ दिवसांत ३० घरांच्या भिंती गणिताच्या सूत्रांनी रंगवल्या. त्याचा खर्च खिशातून केला. आता मुले जाता-येता गणिताची सूत्रे पाठ करतात. सुरुवातीला आमच्याकडे संशयाने पाहणारे गावकरी आज शाबासकी देतात. स्पर्धा परीक्षा वा तत्सम परीक्षेत गणिताशी संबंधित प्रश्न विचारले जातात. मुलांना ते सोडवणे कठीण जाते. म्हणून गणित विषय निवडल्याचे अक्षयने सांगितले. गावातील नागरिक परशुराम कोहपरे म्हणाले, सुरुवातीला अक्षय व त्याचे सहकारी काय करताहेत हेच कळत नव्हते. पण आता त्यांनी खूप चांगले काम केल्याचे दिसते.

X