आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढत बहुरंगी, वडेट्टीवारांची खरी लढाई मात्र भाजपशीच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमाकांत दाणी  

नागपूर - मानव-वन्यजीव संघर्षाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात संवेदशनशील वनक्षेत्र म्हणून ब्रह्मपुरीची (जि. चंद्रपूर) ओळख आहे. वाघ-बिबट्यांचे हल्ले आणि त्यामुळे गावकऱ्यांत उफाळून येणाऱ्या असंताेषाची धग या भागात कायम असते. गेल्या ४० या मतदारसंघाने कायम सत्ताविरोधी कौल दिलेला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेते येथील आमदार आहेत. यंदा त्यांनी तिरंगी किंवा चाैरंगी लढतीला सामाेरे जावे लागेल.

२०१४ मध्येही ब्रह्मपुरीत तिरंगी लढत झाली. चिमूर मतदारसंघ सोडून ब्रह्मपुरीत आलेले वडेट्टीवार यांची लढत भाजपचे तत्कालीन अतुल देशकर व राष्ट्रवादीचे संदीप गड्डमवार यांच्यात झाली हाेती. १३ हजार मतांनी वडेट्टीवार विजयी झाले. पक्षांतर्गत गटबाजीमुळे देशकरांना पराभव पत्करावा लागल्याचे कारण सांगितले जाते. यंदा मात्र दगाफटका खपवून घेणार नाही, असा दम खुद्द फडणवीस यांनी दिला आहे. यंदाही वडेट्टीवार विरुद्ध देशकर असाच सामना हाेण्याची शक्यता आहे. दारूबंदीसाठी काम करणाऱ्या पाराेमिता गाेस्वामी यांना आपने उमेदवारी दिली आहे. गडचिराेली मतदारसंघ राखीव झाल्याने तेथील प्रंचित पोरेड्डीवार, राष्ट्रवादीचे संदीप गड्डमवार तसेच वसंत वारजूरकर हेही भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत. गड्डमवार अपक्षही लढू शकतात. वंचित बहुजन आघाडी, बसप या पक्षांनाही या भागात काही प्रमाणात स्थान असले तरी यंदाही मुख्य सामना काँग्रेस आणि भाजप यांच्यातच हाेऊ शकताे.
 

मानव-वन्यजीव संघर्षाकडे दुर्लक्ष
मागील पाच वर्षांत वडेट्टीवार यांनी मतदारसंघात मोठा निधी खेचून आणला. सिमेंट कांँक्रीटचे रस्ते, पाणीपुरवठा योजना, समाज मंदिरांची बांधकामे, नवरगाव जलशुद्धीकरण केंद्र व ग्रामीण भागातील क्रीडा संकुल अशी कामे केली. मात्र, दुसरीकडे त्यांनी सुरू केलेल्या विकासाच्या अनेक योजना पुढे गेलेल्या नाहीत, असा आरोप भाजपकडून होत आहे. मतदारसंघातील सर्वात गंभीर मुद्दा मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रश्नावर फारसे काही काम झाले नसल्याचा आराेप आहे. ग्रामीण भागात गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा प्रश्नही अतिशय गंभीर आहे. या भागात राइस मिल सोडल्या तर रोजगारक्षम उद्योग नाहीत. औद्योगिक वसाहत तयार झालेली नाही. त्यामुळे रोजगाराची समस्या मोठी आहे.

दारूबंदीचा मुद्दा महत्त्वाचा
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे. महिलांकडून मोठ्या प्रमाणात दारूबंदीचे समर्थन होत असताना दारूबंदी विरोधकांचाही आवाज मोठा आहे. याच मुद्द्यावर ‘आप’च्या नेत्या पाराेमिता गाेस्वामी निवडणूक लढवणार आहेत. या आंदोलनातील नेत्यांचा निवडणुकीत प्रवेश झाल्याने मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपला हाेताे की 
काँग्रेसला याचे वेगवेगळे अंदाज मांडले जात आहेत.

सामाजिक समीकरणे गौण
ब्रह्मपुरी मतदारसंघात कुठल्याही एका समाजाचे प्राबल्य नाही. कुणबी, तेली, अनुसूचित जाती अशा साऱ्याच समाजांचे प्राबल्य दिसते. ग्रामीण भागात आदिवासींचीही काही प्रमाणात संख्या आहे. मात्र, या सामाजिक समीकरणाचा प्रभाव कुठलाही येथे दिसत नाही. व्यक्ती व राजकीय पक्षालाच मतदारांनी महत्त्व दिल्याचे दिसून येते. स्वत: विजय वडेट्टीवार हे गानली या समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

विरोधकांना कौल देणारा
ब्रह्मपुरीने मागील चाळीस वर्षांत सातत्याने विरोधी पक्षाला कौल दिल्याचा इतिहास आहे. हा मतदारसंघ १९७८ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. त्या नंतरच्या काळात सुरेश खानोरकर (अपक्ष आणि जनता दल), नामदेवराव दोनाडकर (शिवसेना), उद्धवराव शिंगाडे, अतुल देशकर (भाजप) या नेत्यांना आमदारकी मिळाली. २०१४ मध्ये विजय वडेट्टीवार यांनी मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला.