वाटूर / वाटूर येथे साकारतेय महाराष्ट्रातील पहिली ५१ फूट उंच विठुरायाची मूर्ती

पंढरपूरला जाणे न झाल्यास वाटूरलाच होणार भक्तांना पांडुरंगाचे दर्शन

दिव्य मराठी

Jun 27,2019 08:35:00 AM IST

वाटूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपुरातील विठ्ठल. आषाढी एकादशी जवळ येताच पंढरपूरच्या वारीची लगबग सुरू होते. जय हरी, विठ्ठल विठ्ठल, माउली माउलीचा जयघोष करत वारकरी मंडळी पंढरपूरकडे रवाना होतात. याच धर्तीवर जालना तालुक्यातील वाटूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग स्थापित श्री श्री ज्ञान मंदिर आश्रमात विठ्ठलाची मूर्ती स्थापन केला जात आहे. औरंगाबाद येथून लोखंडी अँगलचा सापळा करून त्यातून ग्लास फायबरपासून ५१ फूट उंची, तर ७ फूट रुंदीची ही मूर्ती बसवून वाटूरला प्रती पंढरपूर बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


प्रथमच ही मूर्ती वाटूर या ठिकाणी स्थापित होणार असल्याने वारकरी, ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वाटूरला प्रतिपंढरपूर म्हणून नवी अाेळख निर्माण होण्यास मदत होणार आहे. एवढी भव्य दिव्य आणि आकर्षक मूर्ती तयार होत असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ आताच या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. वाटूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे परमपूज्य रविशंकरजी यांचा आश्रम नुकताच स्थापित झालेला आहे. या ठिकाणाहून अनेक समाजाच्या उद्धाराचे कार्यक्रम नेहमी चालू असतात. शेतकरी विषमुक्त प्रशिक्षण, युवकांना रोजगार आणि नेतृत्व करण्यासाठीचे प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, बालसंस्कार, जलसंधारण, शौचालय निर्मिती, व्यसनमुक्ती अशा विविध पैलूंवर या ठिकाणाहून गेल्या वर्षभरापासून काम सतत चालू आहे. यासाठी प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ प्रयत्न करीत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त या ठिकाणी भव्य अशा या विठ्ठलाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा होऊन पंचक्रोशीतील सर्व विठ्ठलभक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येईल. सोबतच नित्यनेमाने या ठिकाणी समाजाच्या हिताचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे वाटूरला निश्चित पंढरपूरचे स्वरूप प्राप्त होईल, असे वायाळ यांनी सांगितले. जे भक्त विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हेच पंढरपूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या मूर्तीचे काम औरंगाबाद येथील कलाकार गेल्या तीन महिन्यांपासून अविरत करत आहेत. त्यामुळे या मूर्तीची आकर्षकता ही तेवढीच सुंदर झाली आहे.

महाराष्ट्रात पहिलीच मोठी मूर्ती
महाराष्ट्रात ही पहिलीच एवढी मोठी मूर्ती साकारली जात आहे. अजून कुठेच एवढी मूर्ती मी तर पाहिली नाही. ४५ दिवस काम करून ही मूर्ती उभी करता आली आहे.
-नंदकुमार हुंबे, कारागीर, औरंगाबाद.

X