आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीक नुकसानीचा पहिला हप्ता 2059 काेटींचा निधी वितरित, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांमधील शेतीपिकांच्या नुकसानीच्या भरपाईचा पहिला हप्ता म्हणून २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपये राज्याच्या महसूल व वन विभागाने मंगळवारी सहा विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिले. यात सर्वाधिक ८१९ कोटी ६३ लाख रुपये मराठवाड्यासाठी उपलब्ध करून देण्यात अाले अाहेत.


राज्यात आॅक्टोबर ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान अवकाळी पाऊस झाला होता. त्यात सुमारे ५४ लाख हेक्टर क्षेत्रावरच्या उभ्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले हाेते. दरम्यान, राज्यात सत्ता स्थापन होऊ न शकल्याने व राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का, अशी चिंता लागली होती. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १६ नोव्हेंबर रोजी खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार व फळबागांसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रुपये मदत जाहीर केली होती. तसेच ही मदत कमाल दोन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे. त्या मदतीसाठीचा निधी मंगळवारी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून देण्यात आला. हा निधी अापद॰ग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हस्तांतरित करण्यात येणार आहे. क्यार व महा या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते.
निधी वाटप असे....  
कोकण विभाग-३४ काेटी ७७ लाख, नाशिक विभाग- ५७३ कोटी ४ लाख, पुणे विभाग- १५० कोटी १५ लाख, औरंगाबाद विभाग -८१९ कोटी ६३ लाख, अमरावती विभाग- ४३९ कोटी ५८ लाख, नागपूर विभाग- ४२ कोटी १७ लाख असा एकूण २ हजार ५९ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

चणचण भागली...
सध्या उपलब्ध करून देण्यात आलेला निधी शेतकऱ्यांना लवकर मिळाल्यास रब्बीतील शेतकऱ्यांची चणचण भागली जाणार आहे. अवकाळी मदतीचा पुढचा हप्ता कधी येणार, याची माहिती मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

बातम्या आणखी आहेत...