औरंगाबाद / महाराष्ट्रातील पहिली महायान पंथीय बौद्ध लेणी नामशेष होण्याच्या मार्गावर

कोरलेल्या मूर्ती झाल्या खराब कोरलेल्या मूर्ती झाल्या खराब

  • अजिंठापेक्षाही घटोत्कच लेणीत मोठी बुद्धमूर्ती, कोरलेल्या मूर्ती झाल्या खराब
  • राज्य सरकारने लेणीसाठी ना रस्ता बनवला ना वाहनाची सोय
  • अजिंठा लेणीपासून केवळ २७ किमी अंतर

दिव्य मराठी

Feb 14,2020 07:42:00 AM IST

शरद दामोदर

फर्दापूर - अजिंठा डोंगररांगेत कोरलेली, महाराष्ट्रातील महायान पंथीय लेणीतील पहिली लेणी म्हणून महत्त्व असलेली आणि जगप्रसिद्ध अजिंठा लेणीपासून केवळ २७ किमीवर असलेली घटोत्कच लेणी राज्य आणि केंद्र शासनाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या या लेणीविषयी कोणताही प्रसार आणि प्रसार होत नसल्याने या लेणीचा विकास तर दूरच, तिथपर्यंत जाण्यासाठी केवळ पाऊलवाट आहे. त्यामुळे बौद्ध संस्कृतीचा प्रगल्भ वारसा सांगणारी ही लेणी विकासापासून कोसो दूर आहे. अजिंठा लेणी प्रकाशझोतात असल्याने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. शासनाच्या विविध योजना राबवून विकास झाल्याने येथे वर्षभर देशी-विदेशी पर्यटक व अभ्यासकांची वर्दळ असते. पण याच डोंगररांगेतील घटोत्कच लेणीला जाण्यासाठी रस्त्यासह इतर कोणत्याही सुविधा नसल्याने पर्यटक व अभ्यासक या लेणीकडे फिरकत नाहीत. वास्तवात राज्य शासन या लेणीची प्रसिद्धी आणि प्रचारही करत नाही. त्यामुळे ही लेणी बहुतांश पर्यटकांना ठाऊकही नाही

अजिंठापेक्षाही घटोत्कच लेणीत मोठी बुद्धमूर्ती


जगातील सर्वात उंच बुद्धमूर्ती अफगाणिस्तानमध्ये होती. तालिबानी दहशतवाद्यांनी ती उद्ध्वस्त केली. आपल्याकडे तालिबानी दहशतवाद अस्तित्वात नाही, मात्र सरकारी दुर्लक्षामुळे आपल्याकडील प्राचीन वारसाही अखेरच्या घटका मोजत आहे. संस्कृतीचा प्रगल्भ वारसा सांगणारी महाराष्ट्रातील घटोत्कच लेणी शासनाच्या दुर्लक्षामुळे लोप पावत आहेत. सरकारी दुर्लक्षाअभावी लेणीची मोठी पडझड झाली आहे.

कोरलेल्या मूर्ती झाल्या खराब


पावसाळ्यात पावसाचे पाणी लेणीत शिरते. यामुळे बाहेरील भागात कोरलेल्या मूर्ती खराब झाल्या असून त्या नामशेष होण्याच्या मार्गावर.

आयताकृती प्रवेशद्वारांचा विहार :

घटोत्कच लेणीचे मुख्य आकर्षण तेथील एक विहार आहे. हे विहार आकाराने चौकोनी असून त्याला ३ आयताकृती प्रवेशद्वार आहेत. समोरील भागास सहा अष्टकोन स्तंभ आहेत. त्यावरही सुंदर कोरीव काम आहे. आत वीस अष्टकोनी स्तंभ असून उजव्या बाजूच्या स्तंभावर मन्नत स्तूप कोरलेले आहे. बाजूला भगवान बुद्धांची विविध मुद्रांतील कोरलेली शिल्पे आहेत. विहाराच्या मागच्या बाजूस ३ गर्भगृहे आहेत.

ब्रह्मी लिपीतील शिलालेख :

विहाराच्या डाव्या बाजूला ७ लहान आणि उजव्या बाजूला ५ खोल्या आहे. विहाराच्या डाव्या बाजूस वाकाटक नरेश हरिशेन यांचा प्रधान वराहदेव याचा २२ ओळींचा ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे.

लेणीला वैभव मिळेल का?:


एकाच डोंगररांगेत अजिंठा व घटोत्कच लेणी आहे. घटोत्कच लेणी शासनाच्या अर्थसाहाय्यपासून वंचित राहिली. लेणीपर्यंत जाण्यासाठी पाऊलवाट आहे. सोयगाव-सिल्लोड तालुक्याच्या मध्यभागी वसलेल्या या लेणीला वैभव कधी मिळेल, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

ना धड रस्ता ना वाहनाची सोय


घटोत्कच लेणीपर्यंत जाण्यासाठी राज्य शासन आजवर रस्ताही बनवू शकले नाही. शिवाय लेणीत वीजपुरवठाही नाही. आलेल्या पर्यटकांना चाचपडतच लेणी पाहावी लागते. पक्ष्यांनी व वटवाघुळांनी लेणीत घरटी बनवली आहेत. प्रवेशद्वार तुटलेले आहे.


साधा फलकही लावलेला नाही


या लेणीकडे कसे आणि कुठून जावे, यासाठी औरंगाबाद -जळगाव महामार्गावर साधा फलक लावण्याचे सौजन्यही सरकारने दाखवले नाही. प्रसार आणि प्रसार ही तर दूरची गोष्ट.

X
कोरलेल्या मूर्ती झाल्या खराबकोरलेल्या मूर्ती झाल्या खराब